
एरव्ही चिरीमिरी, हप्ते घेऊन गाड्या सोडणाऱ्या वाहतूक पोलिसांच्या धाकदपटशामुळे ठाण्यातील मनीष उतेकर (23) या तरुणाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली. ‘ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह’मध्ये पकडलेल्या मनीषने ‘मी पोलीस भरतीची परीक्षा देतोय, माफी मागतो, दंड देतो, मला कोर्टात नेऊ नका,’ असे हातापाया पडत गयावया केली. पण पोलिसांनी केस करून तुझे करियरच बरबाद करतो, अशी धमकी दिल्याचा आरोप करत मनीषने गळफास घेतला. त्याने सुसाईड नोटमध्ये वाहतूक पोलिसांनी केलेल्या छळाची कर्मकहाणीच मांडली असून मुख्यमंत्री राहत असलेल्या ठाण्यात चाललंय काय, असा संतप्त सवाल केला जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या वागळे इस्टेटमधील हनुमान नगरमध्ये मनीष उतेकर राहत होता. त्याची आई लोकांच्या घरी धुणीभांडी करण्याचे काम करते तर वडील सिक्युरिटी गार्डची नोकरी करतात. पोलीस बनून आपल्या कुटुंबाला हातभार लावावा यासाठी मनीष पोलीस भरतीची परीक्षा देत होता. लष्करात भरती होण्याचेही त्याचे प्रयत्न सुरू होते. त्यासाठी त्याने ट्रेनिंगही सुरू केली होती. 16 जुलैला गटारीच्या दिवशी वाहतूक पोलिसांची ‘ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह’ मोहीम सुरू होती. त्या वेळी रात्री साडेदहाच्या सुमारास कोपरी येथून मनीष आपल्या मित्रांसह घरी चालला असताना वाहतूक पोलिसांनी त्याला पकडले. तपासणीत मनीषने मद्यप्राशन केल्याचे उघड झाले. त्यामुळे त्याच्यावर ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. आत्महत्या करण्यापूर्वी मनीषने आईसाठी एक सुसाईड नोट लिहून ठेवली. मला पकडले तेव्हा कित्येक बाईकचालकांना चिरीमिरी लाच घेऊन सोडून दिले. पण मला अडकवून ठेवले. मी तिसऱया दिवशी पोलिसांकडे परत गेलो. माफी मागितली आणि साहेब, काय दंड असेल तो घ्या, पण मला कोर्टात नेऊ नका, नाहीतर माझे करिअर बरबाद होईल, अशी गयावया करीत होतो. पण ट्रफिक पोलीस पुष्पक साहेब आणि सुधाकर साहेब यांनी तुला कोर्टातच नेतो. आम्हाला तुझं करिअरच बरबाद करायचं आहे, अशी धमकी दिली. त्यामुळे मी आत्महत्या करत आहे. आज माझ्यावर जी वेळ आली ती कोणावरही येऊ नये. मी सर्व टॅफिक पोलिसांचा मान ठेवतो. पण यापुढे कधीही कोणाशी असे वागू नका, ज्यामुळे समोरचा माणूस टेन्शनमुळे आत्महत्या करेल. गाडी माझ्या मित्राची आहे. त्यात त्याची काहीही चूक नाही. टॅफिक पोलीस सुधाकर साहेब आणि पुष्कर साहेब यांच्या दबावामुळेच मी आत्महत्या करीत आहे, असे मनीषने सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.
दोषींवर कडक कारवाई करा!
मनीष उतेकर याने आज दुपारी आत्महत्या केल्यानंतर त्याचे नातेवाईक व मित्रांनी ठाणे वाहतूक मुख्यालयात धाव घेऊन संताप व्यक्त केला. दोषी अधिकाऱयांवर तत्काळ कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली.
मनीष उतेकर आणि त्याचे मित्र ट्रिपल सीट चालले होते. मनीषच्या शरीरात अल्कोहोलचे प्रमाण 176 टक्के आढळून आले. वाहतूक पोलिसांनी केलेली कारवाई ही कायदेशीरच होती आणि ड्रंक अँड ड्राइव्हची केस ही कोर्टातच जाऊन सोडवावी लागते. एकदा केस झाली की कोणत्याही पोलीस अधिकाऱयाला दंड घेऊन सोडण्याचा अधिकार नसतो. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांना सोडण्यात आले असते. त्यामुळे मनीषने अशा प्रकारे आत्महत्या करणे हे चुकीचे आहे.
– विनयकुमार राठोड, उपायुक्त वाहतूक विभाग ठाणे































































