
गेल्या काही दिवसांपासून जळकोट तालुक्यात पावसाने झोडपून काढले आहे. अतिवृष्टी काही थांबायला तयार नाही. त्यामुळे तिरु नदीला आलेल्या पुरात शुक्रवारी एक इसम वाहून गेला होता.शनिवारी त्यांचा मृतदेहच सापडला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याप्रकरणी पोलीस स्टेशन, जळकोट येथे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेतील दुर्दैवी मृताचे नाव युवराज चंद्रकांत सूर्यवंशी (38) असे आहे. ते तगरखेडा (ता. निलंगा) येथील रहिवासी होते. 28 जुलै रोजी तिरुका गावातील पुलाजवळ तिरू नदीचे पात्रात हा मृतदेह आढळून आला होता. अतिवृष्टीने तिरु नदीला पूर येऊन पुरात वाहून जाऊन त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे बंधू रवींद्र सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
युवराज सूर्यवंशी हे गेल्या काही महिन्यांपासून बेपत्ता होते. त्यांची मानसिक स्थिती ठीक नसल्याने ते ठिकठिकाणी वास्तव्य करीत होते. त्यांचा पुरात वाहून दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करुन तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.





























































