पंचविशीतील शेतकरी दांपत्याने मृत्यूला कवटाळले!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अवघ्या पंचविशीतील शेतकरी दांपत्याने झाडाला गळफास घेऊन एकत्रित आत्महत्या केल्याची हृदय हेलावून टाकणारी घटना पैठण तालुक्यातील रांजणगाव खुरी येथे घडली आहे. राजू दामोदर खंडागळे (24) व अर्चना राजू खंडागळे (21) अशी त्यांची नावे असून त्यांना अडीच व चार वर्षे वयाच्या दोन मुली आहेत. आईवडील कळायच्या आधीच या चिमुकल्या आता अनाथ झाल्या आहेत.

दुसर्‍याची काही शेती बटाईने करत असताना हे जोडपे मोलमजुरीही करत होते. राजू खंडागळे यांच्या परिवाराकडे अवघी 2 एकर शेती असून, परिस्थिती हलाखीची आहे. आईवडील व दोघा भावांच्या संसाराचा उदरनिर्वाह या शेतीवर भागणे अवघड बनले. त्यामुळे राजू खंडागळे यांनी गावातीलच एका शेतकर्‍याची शेती बटाईने केली. त्यातही उदरनिर्वाह होत नसल्याने ते मोलमजुरीची कामे करीत होते. तरीही निसर्गाची अवकृपा, शेतीतील पिकांवर येणारी संकटे व मजुरीची कामे कधी आहे तर कधी नाही.’ अशा स्थितीत जोडप्याची आर्थिक ओढाताण होत होती. यामुळे ते नैराश्यात होते. शुक्रवारी २८ रोजी पती-पत्नी शेतात गेले होते. सायंकाळी 6 नंतर कधीतरी भोकरीच्या झाडाला दोघांनी गळफास घेतला. ते घरी न परतल्याने कुटुंबातील सदस्य त्यांची वाट पाहत होते. परंतु अंधार पडल्यानंतरही दोघे घरी परतले नाहीत. शिवाय ते मोबाईल फोनही उचलत नव्हते.

अखेर राजूच्या कुटुंबीयांनी शेतात जाऊन शोध घेतला. तेव्हा दोघांनीही झाडाला गळफास घेतल्याचे दिसून आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील हरिश्चंद्र लघाने व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांनाही बिडकीन येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासून मृत घोषित केले. ही माहिती मिळताच बिडकीन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे व बीट जमादार एस. व्ही. वाघमारे यांनी रुग्णालयात धाव घेऊन पुढील प्रक्रिया पार पाडली.