अवती-भवती : कृतज्ञता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सुहास मळेकर

कपडे आपण स्वतः शिलाई केलेले नसतात, चप्पलसुद्धा इतरांनी तयार केलेली वापरतो, घडय़ाळ, दागिने इत्यादीसुद्धा आपण आयते तयार केलेले घालतो. इतकेच काय, तेल, क्रीम, पावडर, लोशन, साबण अशा आरोग्यदायी गोष्टी लक्षात घ्या, पैसा आपला स्वतःचा असला तरी हे सारं तयार होते दुसऱयाच्या विद्वत्तेच्या भरवशावर.

मग आपल्या रुबाबात कसला अभिमान बाळगतो आपण आणि गर्व तरी कसला करतो? आपल्याला हवेत चालताना या सगळ्या कारागीरांबद्दल कृतज्ञता आदर वाटायला नको का? त्या सर्व कलाकार-कारागीरांनी आपले जीवन समृद्ध करून ठेवले आहे. कधी करमणूक करणाऱ्याच्या रूपात, कधी संकटकाळी मदतनीस म्हणून, तर कधी तुमच्या रक्षकाच्या भूमिकेत तो तुम्हाला भेटत असतो.

संशोधकाच्या रूपाने तर त्याने विविध शोध लावून तुमचे जीवन किती सोपे करून ठेवले आहे! पौगंडावस्थेत कधीतरी रागाने अंघोळीची बादली पायाने उडवली तेव्हा आईने आधी फटके दिले आणि नंतर गोंजारून या गोष्टी उदाहरणं देऊन लक्षात आणून दिल्या त्या मनावर कोरलेल्या इथे मी माझ्या शब्दांत सांगितल्या.
आपण सहज कधीतरी इस्त्रीवाल्याला म्हणतो, ‘ही साडी मारून दे रे पटकन, दुपारी लग्नाला जायचेय’ किंवा चप्पल शिवणाऱ्याला म्हणतो, ‘ही चप्पल दे रे शिवून पटकन’ किंवा
‘पॉलिश करून दे रे पटकन.’
पटकन?? त्याच्या मनात काय येत असेल त्याचा विचारसुद्धा आपल्या मनात डोकावत नाही.
‘साहेब करा ना मग तुम्हीच पटकन, माझ्याकडे दुसरे अर्जंट काम चालू आहे,’ त्याने जर असे म्हटले तर घेतलंत ना तोंडात मारून? पण तो गरीब आणि पोटासाठी मजबूर आहे. तो असे म्हणू शकणार नाही याची तुम्हाला खात्री असते. त्याच्या पोटापाण्यासाठी त्याने साधलेली ती पण एक कला आहे.
‘आपल्याला जमत नाही म्हणजे मग ती त्याची कलाच!’
या गोष्टी तुम्हाला जमत असल्या तर ठीक, नाहीतर ही पैशाची गुर्मी ठरते. मदतच तर मागत असता ना, मग ती मागण्यासाठी नम्र भाव असायला काय हरकत आहे. आपण एकमेकांच्या मदतीने जगात वावरत असतो इतकी जाणीव ठेवायला हवी.
सहज ते तरुण वय आठवलं. अस्मादिकांच्या हातात रंगाच्या बाटल्या आणि ब्रश कायम असे. परिसरात एक दुकानवाले चाचा राहात होते. सकाळी दुकान उघडून नंतर ते मुंबईत त्यांच्या दुसऱया दुकानात जात असत. एकदा ते सकाळीच घरी आले. त्यांनी म्हटलं, ‘तुझ्याकडे रंग आणि ब्रश आहेत ते येताना आता लगेच घेऊन ये आणि मी सांगतो तसे इथे माझ्या दुकानाच्या भिंतीवर लिहून दे!’
दुकानाच्या खरबरीत भिंती आणि सिमेंटच्या पोलवर चारी दिशांना वेगवेगळं आठ वेळा लिहायचं होतं, ‘यहां पिलिया की दवा मिलती है’ शिवाय त्याचे मराठी भाषांतर करून लिहायचे होते, ‘इथे काविळीचे औषध मिळेल’
एकतर आमच्यावर झालेले दुनियादारीचे संस्कार आणि त्यात काविळीसाठीचे औषध. वडील आगीने भाजल्यावर परिसरात मोफत औषधपाणी करीत, त्याशिवाय गुण येत नाही म्हणे. अस्मादिकांनी भाषांतर केलं, ‘इथे मोफत काविळीचे औषध मिळेल.’ शिवाय भाषांतराचे इतके स्वातंत्र्य दिलेच आहे तर हिंदीतसुद्धा, ‘यहां मोफत पिलिया की दवां मिलती है’ लिहून टाकलं. चाचांनी रात्री दुकानात आल्यावर जेव्हा हे पाहिलं तेव्हा ते बघून त्यांच्या डोक्यात तिडीक गेली. त्यांनी तिकडे बोलावून धपाटा घालून म्हटलं, ‘दवाएं मोफत देने के लिये यहां धर्मशाला है क्या? यहां ’मोफत’ लिखा है वो मिटा दो.’
खरबरीत भिंतीवरील ऑइलपेंटने लिहिलेले हे ’मोफत’ शब्द पुसून काढण्यासाठी दुसरा दिवसही प्रचंड कष्टात गेला. विशेष म्हणजे हे कलाकाम त्यांनी मात्र मोफत करून घेतले. त्यासाठी पैसे लागतात, बिदागी द्यावी हे त्यांच्या गावीही नव्हते. त्यासाठी कलाकाराने मात्र धर्मशाळा उघडली होती. हा तर कहरच होता. मोफत करून घेऊनही उपकाराची जाणीव दूरच, कृतज्ञ भावही नव्हता. अशी कृतघ्न मानसिकता एखाद्याच्या ठायी कुठून येते?
‘पण अण्णा, त्यांची दोन दुकानं आहेत. ते श्रीमंत आहेत, मग पैसे का देत नाहीत?’ बालसुलभतेनं तेव्हा मी वडिलांना विचारलं.
‘ते आपल्यापेक्षा गरीब आहेत म्हणून,’ वडील म्हणाले.
‘त्यांना द्यायला आपल्याकडे भरपूर आहे, आपल्याला द्यायला त्यांच्याकडे काहीच नाही.’
सोप्या शब्दांत वडिलांनी सांगितलं. मोफत असो, विकत असो घेणाऱ्याकडे किमान कृतज्ञता हवी.