
17 वर्षांच्या 167 कसोटी सामन्यांच्या दीर्घ कारकीर्दीनंतर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने निवृत्तीचा निर्णय जाहीर केला आहे. त्याने गेल्याच मँचेस्टर कसोटीत 600 कसोटी बळींचा टप्पा गाठला असून तो 602 बळींसह आपल्या कारकीर्दीतील शेवटची काही षटके ओव्हलच्या मैदानावर टाकणार आहे. ‘अॅशेस’ मालिकेनंतर तो पुन्हा कसोटी संघात दिसणार नाही. शुक्रवारी कसोटीच्या तिसऱया दिवसाचा खेळ संपल्यानंतरच त्याने आपला हा निर्णय घेतला होता.
आपण गेल्या 17 वर्षांच्या कसोटी कारकीर्दीत क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटला आहे. ओव्हल कसोटीत विजय मिळवून ‘अॅशेस’ मालिकेत बरोबरी साधून देण्यासाठी तो आपल्या अखेरच्या डावात प्रयत्न करणार आहे. याच ब्रॉडला 2007 सालच्या पहिल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये युवराज सिंगने सलग सहा षटकार ठोकले होते आणि तेव्हा सारेच जण म्हणत होते की, ब्रॉडची कारकीर्द संपली. पण त्यानंतर ब्रॉड सलग 17 वर्षे कसोटी खेळला आणि त्याने कसोटी इतिहासात वेगवान गोलंदाज म्हणून सर्वाधिक 602 बळी टिपत जेम्स अॅण्डरसननंतरचे स्थान पटकावले आहे. तो कसोटीत 600 पेक्षा अधिक बळी टिपणारा मुरलीधरन, वॉर्न, कुंबळे आणि अॅण्डरसननंतर पाचवा गोलंदाज आहे.























































