
पुण्यात महात्मा फुले मंडई येथे टिळक पुतळ्याजवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. विविध पक्ष, संघटनांनी हातात काळे झेंडे घेत, काळे कपडे घालत मोदींच्या दौऱ्याला विरोध केला. यावेळी मणिपुरी विद्यार्थ्यांनी हातात पोस्टर घेत आंदोलनात सहभाग घेतला. जमलेल्या आंदोलकांनी हातात पोस्टर घेऊन ‘नरेंद्र मोदी गो बॅक’च्या घोषणा दिल्या आहेत. ‘मन की बात मत करो, काम की बात करो’ असे फलक दाखवण्यात आले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), पुणे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह युक्रांद, हमाल पंचायत, इंडिया फ्रन्ट, सर्व पुरोगामी संघटना, डाव्या विचारसरणीच्या, रिपब्लिकन व आंबेडकर चळवळीतील विविध पक्ष संघटनांचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. यात शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, शिवसेना शहरप्रमुख गजानन थरकुडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते अंकुश काकडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी आमदार कुमार सप्तर्षी, कामगार नेते डॉ. बाबा आढाव, निवृत्त न्यायमूर्ती बी. जे. कोळसे-पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
























































