
मुंबईसह राज्याभरात दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पाऊस उसंत घेणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. मात्र, तो खोटा ठरवत बुधवारी मध्य महाराष्ट्र आणि नागपूरमध्ये दमदार पावसाने हजेरी लावली. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील पावसाच्या अंदाजात बदल झाले असून त्याचा पवासावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो, असे हवामान खात्याने म्हटले आहे. तसेच बुधवारपासून पुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यताही हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
जुलैच्या शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये कोकण विभागात पडलेल्या मुसळधार पावसानंतर दोन दिवस पावसाने विश्रांती घेतली. मात्र आता बदललेल्या हवामानामुळे कोकण विभागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. बुधवारपासून तीन ते चार दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडू शकतो. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील पावसावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.
बांगलादेशच्या किनाऱ्यावर बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे मॉन्सूनसाठी पुन्हा सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी हे कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम बंगालमध्ये गंगाखोरे ओलांडण्याची शक्यता आहे. हे क्षेत्र पश्चिम आणि वायव्य दिशेकडे सरकत आहे. परिणामी बुधवारपासून राज्यात पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होत असून रायगड, रत्नागिरीला बुधवार, गुरुवारसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. रायगड आणि रत्नागिरीत या दोन दिवसांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
सिंधुदुर्गात गुरुवारपर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईमध्येही बुधवार आणि गुरुवार हे दोन दिवस तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून गुरुवारी पालघर आणि ठाणे जिल्ह्यालाही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पालघर आणि ठाणे जिल्ह्यात शुक्रवारीही तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकेल. पुणे घाट परिसर, सातारा घाट परिसरालाही बुधवार आणि गुरुवारी ऑरेंज अलर्ट आहे. या दोन दिवशी पुणे आणि सातारा घाट परिसरामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर कोल्हापूर घाट परिसरामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे आणि सातारा घाट परिसरामध्ये शनिवारपर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचे सातत्य कायम असण्याची शक्यता आहे.
बुधवार आणि गुरुवारी उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता असून नंदूरबार, जळगाव, नाशिक या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. मराठवाड्यात जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर येथे बुधवारी तर संभाजीनगर येथे गुरुवारी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. विदर्भात सगळ्याच जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. 3 ऑगस्टनंतर तीव्र कमी दाबाचे क्षेत्र हळूहळू कमकुवत होत असल्याने पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे, असेही हवामान खात्याने म्हटले आहे.



























































