खाऊच्या गोष्टी : ऊन ऊन खिचडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> रश्मी वारंग

अनेकांना खिचडी आजाऱयांचा आहार वाटतो, तर काहींना मिळमिळीत अन्न पदार्थ, पण सतत बाहेरचे खाऊन पंटाळलेल्या जिवाला काही साधे, सात्त्विक खावेसे वाटते तेव्हा खिचडीला पर्याय नाही. कमीत कमी साधनात जास्तीत जास्त पौष्टिकपणा जपणारी, झटपट तयार होणारी खिचडी महिला वर्गाला वरदान वाटत असेल तर नवल नाही.

थंडगार वातावरणात ऊब आणणारे पदार्थ म्हणजे काहीतरी चमचमीत, तिखटच असायला हवे असा समज पूर्ण मोडून काढत सात्त्विक, झटपट आणि पौष्टिक अनुभूती देणारा पदार्थ म्हणजे खिचडी.

‘खिचडी’ शब्दाचा उगम संस्कृत ‘खिच्चा’मध्ये आहे. तांदूळ आणि शेंगधारी पदार्थांचा वापर करून बनवलेल्या पदार्थाला ‘खिच्चा’ म्हटले जाई. त्याचेच पुढे खिचडी झाले. खिचडीचा सर्वात जुना उल्लेख महाभारतात आढळतो. ग्रीक राजा सेल्युकस निकेटरने हिंदुस्थान भेटीदरम्यान या खिचडीचा उल्लेख केला आहे. मोरोक्कन प्रवासी इब्न बटुटा म्हणतो की, ‘‘भातात काही विशिष्ट धान्य, भाज्या मिसळून त्यात लोणी घालून हिंदुस्थानी लोक नाश्त्यात किशरी नामक पदार्थ खातात.’’ ही किशरी म्हणजेच आपली खिचडी.

मुघल काळात सम्राट अकबर काटकसरीने राहणारा असल्याने खिचडीचा चाहता होता. तो एकटय़ाने जेवणे पसंत करायचा. ‘अकबर बिरबल’ कथांमध्ये बिरबलाची खिचडी आपल्याला माहीत आहे; पण याच अकबराच्या दरबारी अबूल फझल नामक मानकरी होता. असे म्हणतात, अबुल फझलच्या दारी रोज 30 मण म्हणजे चक्क 1200 किलोची खिचडी पकवली जायची. 24 तास येणारा जाणारा कुणीही वाटसरू, प्रवाशी, गावातील मंडळी ही खिचडी मोफत खात. अवध नसीर-उद-दीन शाह यांच्या शाही स्वयंपाकघरातील शाही आचारी त्यांच्या खासमखास खिचडीसाठी प्रसिद्ध होते. मसूर आणि तांदळाच्या दाण्यांच्या आकारात कापलेल्या पिस्ता आणि बदामांपासून एक विलक्षण खिचडी हा आचारी बनवत असे. ‘ऐन-ए-अकबरी’ या ग्रंथात खिचडी बनवण्याच्या सात पाककृतींचा उल्लेख आहे.

आपल्याकडे प्रत्येक प्रांताचे खिचडीशी घट्ट नाते आहे. बंगालमध्ये पावसाळय़ात घरोघरी खिचडीचा खास बेत असतो. बिहारमध्ये शनिवारी कोणत्याही घरी गेलात तरी खिचडीचाच आस्वाद घ्यावा लागतो. कारण पुढच्या दिवशी असणाऱया रविवारच्या मिष्टान्न बेताआधी पोटाला आराम मिळावा हा त्यामागचा हेतू. गोरखपूरमध्ये मकरसंक्रांतीला खिचडीची यात्रा भरते. कश्मीरमध्ये ‘खेतीसिमावास’ या डिसेंबरमधील एका सणात स्थानिक देवतांना बळीचे अन्न म्हणून खिचडी अर्पण केली जात असे. स्थानिक लोक ‘कदम का आचार’सह खिचडीचा आनंद घेतात. हिंदुस्थानच्या दक्षिण भागात मात्र ‘खिचडी’ हा शब्द तितकासा प्रचलित नाही. तामीळनाडू आणि आंध्र प्रदेशातील लोक पोंगल शिजवतात आणि कन्नडिगा हुग्गी तयार करतात.

अधिकृतरीत्या खिचडी राष्ट्रीय आहार असो वा नसो, पण बाळाच्या खिमटीपासून ते खिचडीपर्यंतचा प्रवास म्हणजे शुद्ध सात्त्विकतेचा प्रवास. ऊन ऊन खिचडी, साजूक तूप, लोणच्याची पह्ड आणि सोबत चवीला दही, पापड इतक्या साध्या पदार्थांसह थंडगार हवाही वाफाळती, उबदार होऊन जाते. प्रत्येक घास निव्वळ पूर्णब्रह्म करण्याचे सामर्थ्य या खिचडीत नक्की आहे.

खिचडीचे महत्त्व ब्रिटिश राजवटीत कमी न होता वाढलेच. मसालेदार तिखट जेवण न सोसवणाऱया ब्रिटिशांना खिचडी सोयीची वाटली. मात्र या खिचडीत मासे वा अंडय़ांचा वापर ही ब्रिटिशांनी त्यांच्या सोयीसाठी केला. हिंदुस्थानी आहारातील सात्त्विकता हा देश सोडून जाताना सोबत नेणाऱया ब्रिटिशांनी केजरीला अर्थात खिचडीला डिक्शनरीत समाविष्ट केले.