अळ्यायुक्त दूषित पाणी पिण्याची कोलाम बांधवांवर ओढवली दुर्देवी वेळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अभिषेक भटपल्लीवार

आपला महाराष्ट्र विकासाच्या उंच उंच भरारी घेत असल्याचे दावे नेते करीत असतात. विकासाची गगनभेदी उडान घेतलेल्या याच महाराष्ट्रात बघताच क्षणी ओकारी यावी असं अळ्याची गर्दी असलेलं पाणी पिण्याची दुदैवी वेळ ओढवली आहे. याकडे ना लोकप्रतिनिधी, ना प्रशासनाचे लक्ष गेलं.” आदिम ” समुदायाची असली तरी ती माणसे आहेत, याचा विसर सरकारला झालाय. हृदयाच्या ठिकाणी रस्त्यावरील माती भरून विकासाचा गप्पा करणाऱ्या सरकारची नजर कोलाम बांधवांचा दुःखाकडे आता तरी जाईल काय? हा खरा प्रश्न आहे.

चंद्रपूर जिल्ह्याचा शेवटच्या टोकावर असलेल्या जीवती तालुक्यातील रायपूर (खडकी) हे आदिम कोलाम समुदायचे गाव. गावाची ग्रामपंचायत तीन किमी. लांब. गावाची लोकसंख्या जेमतेम 150 आहे. स्वातंत्र्याची 75 वर्षे उलटली मात्र गावाच्या चेहरा भक्कास अन उजाडच आहे. पेसा क्षेत्रातील गट ग्रामपंचायत खडकी (रायपुर) अंतर्गत रायपुर गावाचा समावेश आहे. गावात समस्यांची गर्दी झालेली आहे. खरी समस्या शुद्ध पिण्याच्या पाण्याची आहे. पाणी आणण्यासाठी येथे गावकरी दीड कि.मी डोंगरात उतरून नाल्याचे पाणी आणतात. ग्रामपंचायतने डोंगराखाली नाल्यात असलेल्या विहिरीवर दोन वर्षापूर्वी सोलर बसवले होते. सोलरमुळे गावात पिण्याचे पाणी येते. मात्र जिथून हे पाणी येते त्या विहिरीतील पाण्यात अळ्या पडल्या आहेत. मागील दोन वर्षापासून या विहिरीत निर्जंतुकिकरणासाठी साधे ब्लिचिंग पावडरही टाकण्यात आलेली नाही. ही विहीर तुटलेल्या अवस्थेत आहे. विहिरीला कटगर नाही. सध्या या विहिरीत आंब्याचे झाड पडलेले आहे. पावसात सोलर चालत नाही.त्यामुळे गावकऱ्यांना पाण्यासाठी डोंगर चढ, उतार करावे लागते.