संवादाची दीपज्योत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगताना काळोखाची लाट केव्हातरी येतेच, त्याक्षणी सकारात्मक संवादाचा दीप घेऊन जो उभा असतो, त्यात मला ईश्वर जाणवतो. कलासृष्टीत पाच दशके वावरताना मला अशी विचाररूप व्यक्तिमत्त्वं भेटत गेली… सांगताहेत लेखक, गीतकार प्रवीण दवणे.

प्रख्यात संगीतकार यशवंत देव यांनी मला माझ्या घडत्या वाटेवर वेळोवेळी असा प्रकाश दिला. विशेषतः ओशो रजनीश यांच्या विचारांचा महोत्सव आयुष्यात आला तो यशवंतराव देव यांच्यामुळेच!

एकदा त्यांनी मला आग्रह धरला, ‘‘प्रवीण, अरे महाबळेश्वरला स्टोरी आहे. स्वतः ओशो बोलणार आहेत. आठ दिवस आहे, तू येच.’’ मी म्हटले, ‘‘नानासाहेब, नाही जमणार हो! खूप गुंतलोय, अनेक कामांच्या गुंत्यात.’’ देवसाहेब चटकन म्हणाले, ‘‘अरे म्हणूनच तर ये, गुंता सुटण्यासाठीच!’’

देव केवळ कवी वा संगीतकार नव्हते, विचारवंत होते. प्रकाशवंत! एकदा प्रख्यात गायिका आशा भोसले यांची मुलाखत मी घ्यावी असे ‘चतुरंग मुंबई’ या संस्थेने सुचवले. खूप दडपण आले. कारण मुलाखत रंगली तर श्रोते म्हणणार, आशा भोसले यांच्यामुळे! मुलाखत बेचव झाली तर तेच श्रोते म्हणणार, प्रवीण दवणे यांनी ती रंगवली नाही. दोन्हीकडून तणाव होता. माझा हा तणाव मी यशवंत देव यांना सांगितला.

देवसाहेब अतिशय मिश्कील! त्यांनी मला विचारले, ‘‘मुलाखत किती वाजता सुरू होईल?’’ मी म्हटले, ‘‘नऊ वाजता!’’
‘‘नि अंदाजे संपेल केव्हा?’’
‘‘रात्री साडेदहापर्यंत!’’
मला कळेना, ते असे का विचारत आहेत ते!
पुढे ते म्हणाले, ‘‘असे समजू, 11 वाजता संपेल.’’
मग थांबून माझ्याकडे पाहत म्हणाले, ‘‘हे बघ, काहीतरी घडणार आहेच, जे ठरलेले आहेच.’’
‘‘म्हणजे, मला कळले नाही.’’
‘‘अरे, तू टेन्शन घेऊन काय होणार? जे काही होणार ते होणारच आहे, 11 तर वाजणारच!’’

अतिशय गमतीने यशवंतराव देव यांनी मला निश्चिंत केले.

कलासाधनेच्या प्रवासात मी थोर कलावंत पाहिले, पण नुसते पाहतच बसलो नाही. समर्थ रामदास स्वामी यांची एक उक्ती आहे, ‘जाणावे जाण त्याच्या स्फूर्तीचे तरंग’.
ते तरंग त्यांच्या विलक्षण सकारात्मक चिंतनात जाणवले.

माझ्या आईचे दुःखद निधन झाल्यानंतर अनेक दूरध्वनी आले सांत्वनाचे. त्यातला एक होता साक्षात लतादीदी यांचा. त्या म्हणाल्या, ‘‘प्रवीण, अहो तुमची एक आई गेली असेल, पण या प्रभुपुंजात तुमच्या चार आई आहेत की! मी आहे, मीना, आशा, उषा.’’
एकदम वाटले, आपण एकटे नाही आहोत. मला वाटते, एकटे वाटू न देणारी ही सोबत, हीच सकारात्मक दीपज्योत. ती मला लाभली म्हणून माझा पथ उजळत राहिला.

संकलन : निनाद पाटील