
आझाद मैदान, वडाळा आगाराबाहेर निदर्शने
कंत्राटी चालक आणि वाहकांनी बुधवारपासून पुकारलेल्या बेमुदत संपाचा तिढा सोडवण्यात बेस्ट उपक्रम, राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेला यश आलेले नाही. त्यामुळे सलग तिसऱया दिवशी संपकऱयांमुळे शाळा, कॉलेज आणि बेस्ट प्रवाशांना मनःस्ताप सहन करावा लागला. बेस्ट उपक्रमाचे 27 डेपो असून शुक्रवारी 18 डेपोमधील भाडेतत्त्वावरील 1 हजार 671 बसेसपैकी 1 हजार 375 बसेस आगाराबाहेर न पडल्याने विद्यार्थ्यांसह प्रवाशांचे हाल झाले. दरम्यान, कर्मचाऱयांनी आझाद मैदान, वडाळा आगाराबाहेर जोरदार निदर्शने केली.
बेस्टने कंत्राटी तत्त्वावर घेतलेल्या मातेश्वरी, डागा ग्रुप, हंसा, टाटा कंपनी, ओलेक्ट्रा स्विच मोबॅलिटी या पंपनीच्या चालक आणि वाहकांनी काम बंद आंदोलन पुकारले असून विविध मागण्यांबाबत लेखी आश्वासन दिले जात नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच ठेवणार, अशी ठाम भूमिका कंत्राटी कामगारांनी घेतली आहे. संपामुळे आज प्रवाशांच्या बस थांब्यावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. कंत्राटी चालक आणि वाहकांच्या काम बंद आंदोलनामुळे बॅकबे, कुलाबा, मुंबई सेंट्रल, वरळी, प्रतीक्षा नगर, आणिक, धारावी, काळा किल्ला, देवनार, शिवाजी नगर, घाटकोपर, मुलुंड, मजास, सांताक्रूझ, ओशिवरा, मालवणी, गोराई आणि मागाठणे अशा एकूण 18 आगारांच्या बसेस आगारात उभ्या राहिल्याने प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. दरम्यान, प्रवाशांच्या सोयीसाठी भाडेतत्त्वावरील 360 बसेस बेस्ट उपक्रमाच्या माध्यमातून आज चालवण्यात आल्या.
काय आहेत मागण्या…
बेस्ट उपक्रमाचे कामगार घोषित करावे, समान कामाला समान वेतन, भाडेतत्त्वावर बस देणारा कंत्राटदार बदलला तरी सेवेचे सातत्य कायम ठेवा, मोटर ट्रान्सपोर्ट कामगार कायद्यातील सुविधा द्या, पगारवाढ, मोफत बेस्ट प्रवास, महिलांसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करा, अशा विविध कंत्राटी कर्मचाऱयांनी केल्या आहेत.
कंत्राटी कंपनीच्या एका बसला 5 हजार दंड
कंत्राटी कंपनीच्या एका बसमागे आम्ही दररोज 5 हजार रुपये दंड आकारणार आहोत. संपामुळे बेस्टच्या बस थांबून राहतात. त्यामुळे त्याव्यतिरिक्त इतरही दंड आम्ही आकारणार आहोत, अशी माहिती बेस्ट प्रशासनाने दिली.
बेस्टच्या मदतीला एसटी धावली 150 बस चालवणार
कंत्राटी बस चालकांच्या संपामुळे अडचणीत आलेल्या बेस्टच्या मदतीला एसटी धावली आहे. कंत्राटी बस चालकांच्या संपामुळे ज्या मार्गावरील बेस्टची वाहतूक ठप्प झाली आहे, त्या विविध मार्गांवर तब्बल 150 बस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी 74 बस आजपासून सुरू करण्यात आल्यामुळे प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
कंत्राटी कामगारांच्या संपामुळे गेल्या दोन दिवसांपासून हजारो चालकांनी संप सुरू केल्याने दीड हजारहून अधिक गाडय़ा आगारातच उभ्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. त्या पार्श्वभूमीवर बेस्टने केलेल्या मागणीनुसार एसटी महामंडळाने 150 बस पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. या बस शिवाजी नगर, देवनार, मुलुंड, घाटकोपर, मागाठाणे, गोराई या आगारा अंतर्गत प्रत्येकी 25 बस चालवल्या जाणार असल्याचे महामंडळाने स्पष्ट केले आहे.



























































