33 कोटी वृक्ष लागवडीची चौकशी पुन्हा लांबणीवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यकालातील 33 कोटी वृक्ष लागवडीची चौकशी करणाऱ्या समितीला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याचबरोबर या समितीच्या सदस्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यकालात 33 कोटी वृक्ष लागवडीसाठी विशेष मोहीम राबवण्यात आली होती. या मोहिमेच्या संदर्भात अनेक तक्रारी आल्या होत्या. यासंदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार रमेश कोरगावकर यांनी 3 मार्च 2021 रोजी उपस्थित केलेल्या प्रश्नावर चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीचे पुनर्गठन करण्याचा प्रस्ताव सरकारने आज विधानसभेत मांडला. या प्रस्तावानुसार समितीत 21 आमदार असून समितीचे अध्यक्षपद संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांना देण्यात आले. आता समितीच्या सदस्यांची संख्या वाढवल्यामुळे हा अहवाल पुढील अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सादर करण्याची मागणी जयंत पाटील, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, भास्कर जाधव यांनी केली, पण पुढील अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी चौकशी समितीचा अहवाल सादर करण्याचे बंधन घालता येणार नाही असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले.