वन विभागाच्या परीक्षेत ‘हायटेक’ कॉपी; सांगलीत दोघांवर गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वन विभागाच्या भरती परीक्षेतील गैरप्रकार राज्यात गाजत असताना सांगलीतही परीक्षेत ‘हायटेक’ कॉपी करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यांतील एकाला पोलिसांनी अटक केली आहे. परीक्षा सुरू असताना तपासणीसाठी आलेल्या पथकाच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

अविनाश संजयसिंग गुमलाडू ( रा. शिवगाव, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) आणि अर्जुन रतन नारडे (रा. संजरपूरवाडी, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. वन अधिकारी युवराज पाटील यांनी दोघांविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यांतील अविनाश गुमलाडू याला अटक करण्यात आली आहे.

मिरज रोडवर असलेल्या वसंतदादा पाटील इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्चमध्ये वनरक्षकपदासाठीचा पेपर होता. पेपर सुरू झाल्यानंतर अविनाश गुमलाडू याने बुटामध्ये मोबाईल लपवून ठेवला होता, तर केसांतून मोबाईल ब्ल्यूटूथ हेडफोन लावून तो पेपर लिहीत होता. मोबाईलवरून छत्रपती संभाजीनगर येथून अर्जुन नारडे त्याला उत्तर देत होता. परीक्षेदरम्यान तपासणीसाठी आलेल्या पथकास ही बाब निदर्शनास आली. यावेळी केलेल्या तपासणीत त्याच्याकडे मायक्रोफोन, मोबाईल, डिव्हाइस अशा वस्तू मिळाल्या. या माध्यमातून तो कॉपी करीत होता. हा प्रकार लक्षात आल्यानंतर वन विभागाच्या पथकाने संशयितास विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात दिले. यानंतर त्यास अटक करण्यात आली.

वन विभागाच्या तपासणी पथकाने हा प्रकार उघडकीस आणला असला, तरी तंत्रज्ञानाची मदत घेत परीक्षेत गैरप्रकार होत असल्याचे समोर आले. गेल्या आठवडय़ातच छत्रपती संभाजीनगर येथे एका ऍकॅडमीचा संचालक प्रश्नांची उत्तरे देताना पोलिसांना सापडला होता.