गव्याचा पोलीस पाटलावर हल्ला, कोयना विभागातील पाथरपुंज येथील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोयना विभागात दुर्गम ठिकाणी वसलेल्या पाथरपुंज गावातील पोलीस पाटील प्रकाश चाळके हे जवळच असणाऱ्या गवीचा ओढा या शेतात पीकपाणी नोंद करीत असताना, अचानक त्यांच्यावर गव्याने हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर कराड येथे उपचार सुरू आहेत.

याबाबतची माहिती मिळताच, हेळवाव वन्यजीव विभागाचे वन्यजीव क्षेत्रपाल एस. एस. जोपाले हे तातडीने कर्मचाऱयांसमेवत घटनास्थळी पोहचून त्यांनी घटनेचा पंचनामा केला. आठवडय़ातील हल्ल्याची ही दुसरी घटना असल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.

सातारा-सांगली-कोल्हापूर या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर कोयना विभागात अतिदुर्गम ठिकाणी पाथरपुंज हे गाव वसले आहे. या ठिकाणी शासनाच्या वतीने सध्या पीक पाहणी नोंदी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांच्यामार्फत हे काम पाथरपुंज येथेही सुरू होते. पाथरपुंजचे पोलीस पाटील प्रकाश चंद्रकांत चाळके (वय 39) हे दुपारी गवीचा ओढा या शेतात पीकपाण्याची नोंद करण्यासाठी गेले होते. याकेळी अचानक गव्याने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्यात त्यांच्या डाव्या बाजूस बरगडीला गव्याचे शिंग लागले असून, पायालाही गंभीर दुखापत झाली आहे. त्यांनी आरडाओरड केल्याने स्थानिक लोकांनी त्या गव्याला हाकलून लावले.

या घटनेची माहिती मिळताच, हेळवाव वन्यजीव विभागाचे वन्यजीव क्षेत्रपाल संदीप जोपाले, वनरक्षक एस. एस. दापते, वनमजूर सपकाळ, गणेश पवार, चालक सचिन विचारे यांना सोबत घेत घटनास्थळी तातडीने पोहोचले व जखमी प्रकाश चाळके यांना पाटण येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी कराड येथील कृष्णा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेचा पंचनामा वन विभागाने केला आहे. गव्याच्या हल्ल्याची या आठवडय़ातील ही दुसरी घटना असल्याने लोकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे.