
नगर जिल्ह्यास उत्तर-दक्षिण जोडणारा महामार्गावरील एकमेव सेतू म्हणजे कोल्हार येथील पूल हा पूल खड्डय़ांनी व्यापला आहे. त्यामुळे पुलावर वाहतूककोंडी ही नित्याचीच गोष्ट झाली आहे. यामुळे चालक हैराण झाले असून, या पुलावरील दोन्ही बाजू व मध्येच पडलेले खड्डे बुजविण्याचे औदार्य बांधकाम खात्याने दाखवावे, अशी मागणी होत आहे.
नगर-मनमाड रस्त्याची कुप्रसिद्धी राज्याबाहेर पसरलेली आहे. जवळपास 30 वर्षांपासून या रस्त्याचे होणारे काम रेंगाळलेले आहे. रस्त्याच्या कामास मुहूर्त केव्हा लागणार, हे सांगता येत नाही. ठेकेदार या रस्त्याचा ठेका घेतो अन् काहीतरी कारणाने या रस्त्याचे काम थांबविले जाते, ही नेहमीच गोष्ट झाली आहे. हे काम पूर्णत्वास का जात नाही, हे एकतर बांधकाम खाते किंवा राजकीय नेतेच सांगू शकतील, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
कोल्हारचा जुना पूल अखेरची घटका मोजत असल्याने या पुलास समांतर दुसरा पूल उभारण्यात आला. परंतु या पुलावरील अवजड वाहतूक लक्षात घेता ‘मज सोसवेना भार, जड झाले ओझे’ अशी पुलाची अवस्था बनली आहे. अवजड वाहतुकीने पुलावर वारंवार खड्डे पडत आहेत. ते बुजविण्याची साधी तसदीसुद्धा बांधकाम विभाग घेत नसल्याने वाहनचालकांमधून संताप व्यक्त होत आहे.
एव्हाना नगर-कोपरगाव रस्ता तसाही अनेक वर्षांपासून खड्डय़ात गेलेला आहे. या रस्त्याचे काम कधी होईल हे कुणीही ठोस सांगू शकत नाही. मात्र, कोल्हारच्या पुलावरील खड्डे बुजविण्याचे औदार्य दाखविणे गरजेचे आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला खड्डे पडल्याने वाहतूक पुलाच्या माध्यमातून सुरू आहे. यामुळे वारंवार वाहतूककोंडी कोल्हारकरांच्या पाचवीला पूजली आहे. नगर-कोपरगाव रस्ता व कोल्हारच्या पुलावरील खड्डे तातडीने बुजविण्याचे काम बांधकाम विभागाने करावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
नगर-कोपरगाव रस्ता श्रीक्षेत्र शिर्डी, शनिशिंगणापूर आणि भगवतीमातेच्या साडेतीन शक्तिपीठांना जोडणारा आहे. सध्या या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या तीर्थक्षेत्री येणाऱया भक्तांची संख्या रोडावत आहे. किमान या रस्त्याचे काम पूर्णत्वास नेऊन रोज होणारे छोटे-मोठे अपघात रोखणे शक्य होणार आहे.
जुन्या पुलाची झाली दुरवस्था
कोल्हारच्या नवीन पुलास समांतर असा जुना पूल होता. त्याची दुरवस्था झाल्याने नवीन पूल उभारण्यात आला. जुन्या पुलावरून किमान दुचाकी धावत होत्या. आता जुना पूल उद्ध्वस्त केल्याने नवीन पुलावरून सर्व वाहतूक सुरू आहे. मात्र, अहोरात्र सुरू असलेल्या अवजड वाहतुकीमुळे पुलावर खड्डे पडले आहेत.

























































