
– दोन महिन्यांपासून पद रिक्त; ‘चार दिवसांत अधिकारी देतो’ म्हणणारे पालकमंत्री गायब
– कोल्हापूरकरांचे ‘दाजीबा’ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र
– लोकप्रतिनिधींच्या घरारसमोर 15 ऑगस्टनंतर ‘बोंब मारो’ आंदोलन करण्याचा इशारा
विविध महत्त्वाच्या प्रशासकीय विभागांत अजूनही जबाबदार अधिकाऱयांची वानवा आहे. महापालिकेचे आयुक्तपद तब्बल दोन महिन्यांपासून रिक्त आहे. चार दिवसांत हे पद भरले जाईल, असे आश्वासन देणारे पालकमंत्रीच आठ-दहा दिवसांपासून कोल्हापूरकडे फिरकलेले नाहीत. येत्या 15 ऑगस्टपूर्वी आयुक्त, नगररचना संचालक, शिक्षणाधिकारी मिळाले नाहीत, तर लोकप्रतिनिधींच्या घरांसमोर ‘बोंब मारो’ आंदोलन करण्याचा इशारा कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने दिला आहे. याबाबत कोल्हापूरचे ‘दाजीबा’ असलेल्या केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र पाठविण्यात आले आहे.
पदे रिक्त असण्यासंदर्भात यापूर्वी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, तसेच केंद्रीय गृहमंत्र्यांनाही निवेदने देण्यात आली आहेत; पण येथील लोकप्रतिनिधी याबाबत काहीच हालचाल करीत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ‘दाजीबा, कोल्हापूरकडे तुमच्या शासनाचे दुर्लक्ष का? आम्हाला विकास हवा आहे; पण प्रथम मूलभूत सुविधा तरी द्या,’ अशा आशयाचे पत्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पाठविण्यात आले आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापुरातून देशाला समतेचा विचार दिला गेला; पण या नगरीवर तुमच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणाऱया महाराष्ट्र शासनाचे दुर्लक्ष आहे. ‘वेगवान’ कारभार करताना कोटय़वधी रुपयांची जाहिरात करून ‘शासन आपल्या दारी’ आणणार असल्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दररोज सांगतात. मात्र, त्यांचे शासन आमच्या शहराच्या दारापर्यंत काही आलेले नाही, असे पत्रात म्हटले आहे.
कोल्हापूर महापालिकेला दोन महिने झाले तरी आयुक्त दिलेला नसल्याने शहराच्या दैनंदिन कामकाजाचा खोळंबा झाला आहे. नगररचना विभागाला महाराष्ट्र नगररचना अधिकारी दिलेला नसल्याने बांधकाम परवाने प्रलंबित आहेत. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नवाढीवर परिणाम झाला आहे. शिक्षण विभागाला तर गेली 12 वर्षे शिक्षणाधिकारी दिलेला नाही. शिवाय करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरासह पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीवर प्रशासक म्हणून जिल्हाधिकारी काम पाहत आहेत. देवीच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येतात; पण त्यांच्यासाठी स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, पार्ंकग अशा मूलभूत सुविधासुद्धा जिल्हाधिकारी देऊ शकलेले नाहीत. याबाबत दिलेल्या लेखी निवेदनाला त्यांनी केराची टोपली दाखविल्याची खंतही या पत्राद्वारे व्यक्त करण्यात आली आहे.
तुम्ही तर आमचे दाजीबा, सासुरवाडीला न्याय द्या
ह जिल्हाधिकाऱयांकडेच महापालिकेच्या प्रभारी आयुक्तपदाचा कार्यभार दिलेला असून, त्यासाठीही ते पुरेसा वेळ देत नाहीत. शिक्षण विभागातील शिक्षकांच्या, तसेच नगररचना (बांधकाम) विभागातील नियमित बदल्यांची महत्त्वाची प्रकरणेही त्यांनी प्रलंबित ठेवण्यासह जिल्हाधिकाऱयांनी जिह्यात बंदीहुकूम काढून मुख्यमंत्र्यांच्या सभा, मेळाव्यास वेगळा आणि सामान्य जनता, संघटना, कार्यकर्त्यांना वेगळा न्याय दिल्याचा आरोप करीत, तुमच्या पक्षाच्या नेतृत्वाखाली असणारे महाराष्ट्र शासन कोल्हापूरवर अन्याय करीत आहे. तुम्ही आमच्या कोल्हापूरचे दाजीबा आहात, म्हणून तुमच्याकडे कोल्हापूरची व्यथा मांडत आहोत. तरी कृपया तुमच्या सासुरवाडीला न्याय द्यावा, अशी विनंती पत्राद्वारे करण्यात आली आहे.
























































