
हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढय़ाचे साक्षीदार असलेले ग्रँट रोड विभागातील ऑगस्ट क्रांती मैदान धगधगत्या स्वातंत्र्यलढय़ाचा इतिहास जागवणार आहे. पालिकेच्या माध्यमातून मैदानाचे सुशोभीकरण करून मैदानाला मूळ रूप देण्यात आले आहे. शिवाय या ठिकाणी स्वातंत्र्यलढय़ाची आठवण दर्शवणारे आकर्षक भित्तीचित्र तयार करण्यात आले असून ‘ऑगस्ट क्रांती’ आंदोलनात सहभागी क्रांतिकारकांची नावेही दर्शवली गेली आहेत. या सुशोभीकरण कामाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालिका आयुक्त प्रशासक इकबाल सिंह चहल आदी मान्यवरांच्या उपस्थितीत आज करण्यात आले.
हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढय़ात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी निर्णायक ‘चले जाव’, ‘छोडो भारत’चा नारा ऑगस्ट क्रांती मैदानातूनच दिला. गवालिया टँक अशी या मैदानाची ओळख होती. 9 ऑगस्ट रोजी उसळलेले आंदोलन ‘ऑगस्ट क्रांती’ मैदान म्हणून ओळखले जाते. दरम्यान, गेल्या काही वर्षांत या मैदानाच्या मूळ स्वरूपात अनेक बदल झाल्याने सहा भागांत विभागणी झाली. यामध्ये खेळाचे मैदान, नाना-नानी पार्क, लहान मुलांचे गार्डन, हॉलीबॉल मैदान अशा पाच ते सहा विभागांत मैदानाची विभागणी झाली. मात्र यामुळे मैदानाचा मूळ इतिहास झाकोळला जात होता. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या माध्यमातून मैदानाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या पुरातन वास्तू जतन कक्षातर्फे हे काम करण्यात आले आहे. या कार्यक्रमाआधी मान्यवरांनी मैदानातील स्मृती स्तंभाला पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर ‘शिलाफलकम’चे अनावरण करण्यात आले. या फलकावर स्वातंत्र्यवीरांची, शहिदांची नावे कोरण्यात आली आहेत. तसेच स्वातंत्र्यसैनिकांच्या आप्तांचा प्रातिनिधीक स्वरूपात सन्मान करण्यात आला. सर्व मान्यवर, उपस्थित नागरिकांनी हातात माती घेऊन शपथ घेतली. मान्यवरांच्या हस्ते ऑगस्ट क्रांती मैदानात प्रातिनिधीक स्वरुपात वसुधा वंदन उपक्रमा अंतर्गत रोपटे रुजविण्यात आले.
n सुशोभीकरण कामात मैदानाच्या पुंपणभिंतीला लोखंडी जाळ्या व लोखंडी दरवाज्यांची दुरुस्ती व उभारणी, मैदानाच्या उत्तर-पश्चिम भिंतीला भित्ती शिल्पाद्वारे स्मारक करणे, मैदानात व सभोवताली पुरातन शैलीच्या विद्युत खांबांची उभारणी, मैदानाच्या मध्य पदपथावर बेसॉल्ट दगडाची फरसबंदी करणे, मैदानाच्या पदपथावर असलेली बेस्टची टर्मिनल चौकी, घनकचरा चौकी स्थलांतरीत करून मैदानाची दृष्यमानता वाढवण्यात आली आहे. शिवाय एन.एम. पेटीट यांच्या पुतळ्याचे संवर्धन व वाहतूक बेटाचे सुशोभीकरण, रे रोड पुलाच्या पुनर्बांधणीदरम्यान बाजूला काढलेल्या पुरातन दगडी खांबांची ऑगस्ट क्रांती मैदानाच्या प्रवेशद्वाराजवळ पुनर्स्थापना करण्यात आली आहे.



























































