
>> दिलीप देशपांडे, [email protected]
युवा दिन साजरा करताना शासनाने अनेक गोष्टी विचारात घ्यायला हव्यात. युवा शक्तीला, युवा संघटनांना विधायक वळण द्यायला हवे हे मात्र नक्की. युवक हेच देशाचे खरे भांडवल आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही आणि म्हणूनच त्यांच्या समस्यांकडे त्यांना शिक्षणाप्रमाणे रोजगार संधी मिळेल याकडे लक्ष दिल्यास युवकही परदेशी शिक्षणाकडे आकर्षित न होता देशातच राहून आपल्या ज्ञानाचा फायदा देईल यात शंका नाही. हा दिवस साजरा करत असताना प्रामुख्याने युवा पिढीच्या प्रश्नावर विचार व्हायला हवा.
आज एकूण राजकीय परिस्थिती बघितली तर सैरभैर झालेली आहे.सत्तेसाठी राजकारण कसे सुरू आहे हे आपण बघतच आहे आणि त्यात महत्त्वाचे प्रश्न, जसे बेरोजगारी हा युवकांसोबतचा महत्त्वाचा प्रश्न आहे, ते मात्र बाजूला पडत आहेत. जसे शिक्षित युवक आहेत, त्यांच्या समोर नोकरीचा प्रश्न आहे. तसेच जो शिक्षित नाही, परंतु शेती या फार मोठय़ा व्यवसायात गुंतलेला आहे, त्याच्या डोळ्यांसमोर शेती पिकवणे आणि ती टिकवून ठेवणे यातच तो गुरफटला आहे, त्याचीही अनेक प्रश्न आहे तेसुद्धा बऱयाच अंशी दुर्लक्षित राहतात.
आपण म्हणतो, देशाच्या प्रगतीचे सुकाणू युवकांच्या हाती आहेत असे म्हटले जाते. भारत हा जगातील सगळ्यात मोठा तरुणांचा- युवकांचा देश आहे. भारतात पासष्ट टक्के युवकांची संख्या आहे, असे म्हटले जाते. युवा पिढीच्या क्षमतेवर, ताकदीवर भारतही जागतिक महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहत आहे. आजच्या परिस्थितीत काही ठरावीक युवा पिढीत नवीन शिकण्याची आवड आहे, जिद्दही आहे. देशाच्या विकासात त्यांचा सहभाग आहे. आज देशाच्या सीमेवर जाऊन आपल्या देशाचे रक्षण करणारा देशभरातील युवकच आहे. त्याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे.
जागतिक स्तरावर 12 ऑगस्ट हा दिवस जागतिक युवा दिवस म्हणून साजरा केला जातो. युवकांशी निगडित काही विषयांवर चर्चा घडवून आणली जाते.
लिस्बन येथे 8 ते 12 ऑगस्ट 1998 मध्ये पार पडलेल्या युवकांशी निगडित मंत्र्यांच्या परिषदेत 12 ऑगस्ट हा दिवस जागतिक युवा दिवस साजरा करण्याची शिफारस केली गेली आणि त्यावर 17 डिसेंबर 1999 रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने शिक्कामोर्तब केले. तेव्हापासून 12 ऑगस्ट हा दिवस जागतिक युवा दिवस म्हणून साजरा होतो.
युवा दिवस साजरा करत असताना युवकांशी निगडित काही विषय/प्रश्नांची शासकीय आणि युवा पातळीवर चर्चा होणे आवश्यक वाटते.
काय आहेत ते प्रश्न ?
n युवक आणि विद्यार्थी संघटना n युवक आणि राजकीय संघटना
n युवक आणि सोशल मीडिया n युवक आणि राजकारण
n युवक आणि सामाजिक जाणिवा, जबाबदारी n युवक आणि शेती व्यवसाय
महाविद्यालयीन स्तरीय युवकांच्या विद्यार्थी संघटना आहेत. एकेका महाविद्यालयात दोन/तीन/चार अशा संघटना बघायला मिळतात. या संघटना कुठल्या ना कुठल्या पक्षाच्या अधिपत्याखाली कार्य करत असतात. त्यामुळेच पक्षापक्षांतील मतभेद यांच्यातही पहायला मिळतात. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवणे, अॅडमिशनमधला, मग तो महाविद्यालय, हॉस्टेलमध्ये अॅडमिशन, जादा फीस आकारणीकडे लक्ष देऊन विद्यार्थी वर्गाला न्याय मिळवून देणे हे महत्त्वाचे काम संघटनेचे आहे, पण यांचा अधिकतर वेळ वादातच जातो. बऱयाच वेळा पोलिसांपर्यंतही वाद जातात. मुंबई, पुणे, दिल्ली आदी अनेक ठिकाणच्या मागील काही काळात घडलेल्या घटनांवरून दिसते, काय आणि किती हिंसक स्वरूप असते ते.
राजकीय पक्षाच्या युवा संघटना, शाखा आहेत, पण त्यात अगदीच नगण्य युवकांना कुठल्या तरी मंडळावर, सहकारी बँकेवर, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांवर त्यांची वर्णी लागते. त्यातही जवळच्या कार्यकर्त्यांनाच संधी दिली जाते. बाकी युवक हे आधारस्तंभ असतात, पण ते आधारस्तंभ अधांतरीच असतात. त्यांच्या भवितव्याचा कुठलाही विचार त्यांच्या जवळ नसतो.
आजचा युवक इंटरनेट,मोबाईल, इन्स्टाग्राम, फेसबुक,व्हॉट्सअॅप अशा सोशल मीडियाच्या जाळ्यात नको तितका अडकला आहे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. हवा तेवढा उपयोग न घेता, नको तेवढा दुरुपयोग केला जातो. त्यामुळे फार मोठय़ा प्रमाणात युवक त्यात अडकून आत्ममग्न झालाय. चुकीच्या दिशेने वापर होतोय.
कलाकार, खेळाडू, सेलिब्रिटींना मोठय़ा रकमेचा मोबदला देऊन ऑनलाइन गेमच्या जाहिराती केल्या जातात व तरुणांना आकर्षित केले जाते. हे गेम म्हणजे एक जुगारच असतो. तरुणांना विधायक कार्याकडे ओढण्याऐवजी हे असले प्रकार तरुण पिढीचे दिशा बदलून टाकत आहे आणि त्यांच्याभोवती अशा गेमचा विळखा घातला गेला आहे. त्यात तरुण पिढी बरबाद होत आहे. या गोष्टीकडे गंभीरपणे बघितले गेले पाहिजे आणि अशा प्रकारांवर बंदी आणायला हवी आहे. अनेक राज्यांत यावर बंदी आहे. महाराष्ट्र सरकारला त्याची आवश्यकता वाटत नाही का? युवकांच्या विकासाच्या योजनांचा विचार करत असताना अशा गोष्टींकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही.
संवाद कमी होतोय, वाचन कमी झालंय. काही वेळेला युवकांमध्ये वैचारिक क्षीणता आल्याचे जाणवते.
नवीन तंत्रज्ञान मिळतंय, सगळं जग जवळ आलंय, पण माणसं हरवली आहेत. मीडियाचा योग्य वापर करण्याची समज नाही. म्हणून वाटते, विधायक वळण द्यायला हवे.
खरं तर युवा शक्तीत खूप सामर्थ्य नक्कीच आहे. स्वामी विवेकानंदांच्या जयंतीलाही राष्ट्रीय युवा दिवस साजरा करतो. त्यांना युवा शक्तीवर खूप विश्वास होता. ‘युवा’ शब्दातच वायू म्हणजे गती आहे. त्यांना संस्कारक्षम, कणखर, राष्ट्राप्रति, समाजाप्रति प्रेम असणारा निर्व्यसनी युवक अपेक्षित होता, आहे.
युवा दिन साजरा करताना या सर्व गोष्टींची चर्चा,सर्व क्षेत्रांतील युवकांना, युवा संघटनांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊन व्हायला हवी. युवकांची ‘मन की बात’ ओळखायला हवी. शासनाने बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यायला हवा आहे. नवनवीन संधी प्राप्त करून द्यायला हव्यातच. हाच त्यावर एकमेव उपाय आहे. नाहीतर राष्ट्राची ताकद म्हणून ज्या युवकांकडे आपण पाहतो ती युवा पिढी राजकारण, सोशल मीडियाच्या, निवडणुकीच्या फेऱयात बरबाद होणार हे निश्चित!
आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत, तो करीत असताना या प्रश्नाकडे गंभीरपणे बघणे आणि विचार करणे अतिशय आवश्यक आहे.































































