
प्रत्येकाच्या आयुष्यात येतो ना, तसा ‘टर्निंग पॉइंट’ माझ्याही आयुष्यात आला. किमयागारांनी आयुष्य बदलून टाकले… सांगतोय, अभिनेता अभिनय सावंत.
पोर्तुगीज चर्चजवळची साल्वेशन स्कूल ही माझी शाळा. शाळेत असताना मी स्लो लर्नर होतो. शिकवलेले कळायचे, पण आत्मसात करायला वेळ लागायचा. कर्सिव्ह रायटिंगमध्ये तर आनंदीआनंदच होता. त्यामुळे मग शिक्षकांचा आरडाओरडा, दर दोन-चार आठवडय़ांनी मम्माला शाळेतून आलेले पेरेंट टीचर मीटिंगचे आमंत्रण आणि मग तो फायरिंगचा सोहळा हा सिलसिला सुरू होता.
प्रत्येकाच्या आयुष्यात येतो ना, तसा टर्निंग पॉइंट’ माझ्याही आयुष्यात आला. शाळेत आम्हाला ब्रदर फर्नांडिस या नावाचा देवदूत शिकवायला आला. आम्हा साऱया विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी आमूलाग्र बदल घडवले. नवनवीन गोष्टी शिकण्याची, त्या आत्मसात करण्याची गोडी निर्माण केली. एखादी गोष्ट जेव्हा तुम्हाला आवडते ना, तेव्हा तुम्ही जिवाचे रान करून ती करता. या आणि अशा छोटय़ा छोटय़ा टिप्स देऊन ब्रदर फर्नांडिस यांनी आमचा अभ्यासाचा पाया भक्कम केला. शिकवताना ते काही युक्त्या वापरायचे. चित्र-विचित्र अशी नावे ठेवायचे. छोटय़ातली छोटी गोष्टही लक्षात ठेवायला सोपी जावी म्हणून… 360 अंशांमध्ये माझे आयुष्य बदलून गेले. असे माझे हे गुरू ब्रदर फर्नांडिस. ही जादू केवळ तेच करू जाणे.
माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याला त्यांनी वळण लावले आणि प्रत्येकामधील गुणदोष हेरून त्यांना त्यांच्या त्यांच्या पद्धतीने घडवले. कुंभार जसा मातीच्या ओलसर गोळय़ाला आकार देतो, घडवतो… तसे त्यांनी आमचे आयुष्य घडवले आणि स्वतःकडील ज्ञान हातचे न राखता आमच्या ओंजळीत टाकले. प्रत्येक व्यक्तीमध्ये एनर्जी सेन्सर्स असतात, फक्त ती प्रेस करायला योग्य व्यक्ती आणि योग्य वेळ यावी लागते. मुख्य म्हणजे तुमच्यामध्ये इतकी सारी सकारात्मक ऊर्जा ठासून भरलेली आहे याची तुमची तुम्हाला जाणीव व्हायला हवी. झिप फाइल आणि अन्झिप करायला हवी हे आणि असे बरेच ब्रदर फर्नांडिस आम्हाला शिकवायचे. त्यांना ‘धन्यवाद’ मी कधीच म्हणणार नाही.
आजन्म त्यांच्या ऋणात रहायला मला निश्चितच आवडेल. माझे आणखीन एक गुरू म्हणजे ग्रँड मास्टर चोआ कॉक सुई. ज्यांना मी प्रत्यक्ष भेटलो नाहीये, पण त्यांच्या विचारसरणीचा प्रचंड प्रभाव माझ्यावर आहे. ‘प्राणिक हीलिंग’ ही पूरक उपचार पद्धती. रुग्णाला हात न लावता आजार बरा करते. या उपचार पद्धतीचे जनक मानले जाणारे ग्रँड मास्टर चोआ कॉक सुई ज्यांनी या उपचार पद्धतीमध्ये सुसूत्रता आणून त्याला वैज्ञानिक पाया दिला. त्यांनी मोठय़ा मेहनतीने विविध देशांमध्ये अनेक ‘प्राणिक हीलिंग’ सेंटर्स स्थापित केली. अनेक पुस्तके लिहिली. स्वतःकडून दुसऱया व्यक्तीला जमेल ती मदत केली पाहिजे. त्याचे दुःख समजून घेऊन आपण ते दूर केले पाहिजे. दुसऱयाविषयी असणाऱया आपल्या दृष्टिकोनामध्ये ममत्व हवे, तरच आपण समोरच्याच्या वेदना दूर करू. आसवांचे परिवर्तन हसण्यात करू शकतो. त्यांचे हे विचार मला एक माणूस म्हणून जगताना महत्त्वाची भूमिका बजावतात. आमच्या घरातल्या साऱयांनीच हे प्रशिक्षण घेतलेले आहे आणि आमच्यापरीने आम्ही दुसऱयाला मदत करतो.
‘प्राणिक हीलर’ ग्रँड मास्टर चोआ कोक सुई यांना आदराने ‘मास्टर’ म्हणतात. माझ्यासाठी ते सर्वार्थाने मास्टर तर आहेतच, पण माझ्यातल्या ‘मी’साठी ते एक ‘किमयागार’ आहेत.
शब्दांकन ः निनाद पाटील

























































