
>> संजय मोने
विलक्षणशी मैत्री कधी, कशी आणि मुळात का झाली हे आठवत नाही.विलक्षण हे काही त्याचं नाव नाही, पण त्याला सगळे ‘विलक्षण’ याच नावाने ओळखत असत. आपल्या अंगी असलेल्या नाना गुणांनी स्वतःबद्दल जरब निर्माण करणारा, राजकारणात रस घेणारा, चहा, सिगारेट आणि नाटक-सिनेमा यांची जबरदस्त आवड असणारा, आमच्या कॉलेजचा विद्यार्थी नसतानाही सकाळी सकाळी कॉलेरच्या कँटिनमध्ये हजेरी लावणारा असा हा मित्र. काही काही माणसं आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या वयात, आगळ्या स्तरांवर किंवा भिन्न मार्गांनी येतात आणि त्यांच्यामुळे मैत्रीचा खरा अर्थ कळतो. त्यापैकीच एक असा विलक्षण.
काही काही माणसं आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या वयात, आगळ्या स्तरांवर किंवा भिन्न मार्गांनी येतात. आता पालक किंवा नातेवाईक, भावंडं, शेजारी-पाजारी कोण आहेत हे आपल्या हातात नसतं. कधी कधी ते आपले गतजन्मीचे भोग आहेत असं समजून त्यांच्या बरोबर दिवस किंवा वर्षे घालवावी लागतात. नशीब बलवत्तर असेल तर ती सगळीच्या सगळी फार छान असतात. दुःखात फार जवळ येत नाहीत, सुखद क्षणी “पार्टी पाहिजे! पार्टी पाहिजे” म्हणून कोलाहल करत तुमच्या आनंदात अडचण आणत नाहीत.
एका इंग्रजी महान साहित्यिकाने म्हणून ठेवलंय (तो कोण हे त्याच्या मूळ संहितांवर डल्ला मारून मराठी नाटकं लिहिणाऱया नाटककारांकडून खात्री करायला हवी, पण कबूल कोण करणार?). त्याने म्हटलंय,“परमेश्वर मागच्या जन्मीची पापं म्हणून तुम्हाला नातेवाईक देतो, पण तो दयाळू आहे, तो उ:शाप किंवा उतारा म्हणून मित्रही प्रदान करतो.” माझ्या आजच्या लेखाचा नायक असलेल्या मित्राच्या बाबतीत वरील विधान शंभर नाही; तर एक हजार टक्के खरं आहे. मला वयाने साधारण दीड वर्ष तो ज्येष्ठ आहे… माफ करा, होता. आज तो या जगात नाही, पण त्याची क्षणोक्षणी आठवण येते असं खोटं नाही लिहिणार, तर वारंवार आठवण येते. कधी कधी जेव्हा थोडय़ा आगळ्या व्यक्ती भेटतात तेव्हा तर हटकून येते. कारण तो होताच विलक्षण! त्याचं नाव महत्त्वाचं नाही. कारण त्याला सगळे ‘विलक्षण’ याच नावाने ओळखत असत. आम्ही कॉलेजात होतो तेव्हा तो कँटीनमध्ये सकाळी हजर असायचा. तो आमच्या कॉलेजचा विद्यार्थी नव्हता… म्हणजे माजी होता. नंतर तो अभियांत्रिकी कॉलेजचा विद्यार्थी झाला होता, पण तो असायचा आमच्या कँटीनमध्ये… त्याच्या पुस्तकांसहित. पुस्तकं म्हणजे एक वही असायची आणि त्यात त्याचा अभ्यास सोडून सगळं असायचं. चांगला सहा फूट उंच, दिसायला दहा जणांत उठून दिसेल असा. आमची मैत्री कधी, कशी आणि मुळात का झाली हेच आठवत नाही.
चहा, सिगारेट आणि नाटक-सिनेमा यांची जबरदस्त आवड. तेव्हा जवळच्या चित्रपटगृहात सकाळी अकराचा अर्ध्या किमतीत एक खेळ असायचा. त्याला तो हजर असायचा. चित्रपट कुठला? नायक-नायिका कोण? वगैरे गैरलागू मुद्दे आमच्या आड यायचे नाहीत. दोन रुपयांत तीन तास आरामात निघून जायचे. आम्ही पाच-सात जण कायम तिथेच असायचो. चित्रपट बघून झाला की, मग आपापल्या घरी जायचो. हा आमचा मित्र त्याच्या कॉलेजला जायचा. तिथे चेहरा दाखवून परत शिवाजी पार्क कट्टय़ावर मैफल जमायची. पाहिलेले चित्रपट, त्यावर चर्चा, गाणी गुणगुणणे. रात्र झाली की – आमच्या काळात साडेसातच्या आसपास ती व्हायची ö की, घरी. पुन्हा दुसऱया दिवशी थोडय़ाफार फरकाने तोच दिपाम. मधून मधून अभ्यास आड यायचा.
आमचा मित्र विलक्षण का? कारण या सगळ्या व्यग्रतेमधून त्याला इतर अनेक फंद मागे लावून घ्यायचा छंद होता. सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे राजकारण. आम्ही इतर सगळे त्या काळात राजकारण वगैरे भानगडी अंगाला लावून घ्यायचो नाही, आजही चार हात दूरच आहोत, पण तो, सगळीकडे त्याचा राबता. बहुधा तो जनसंघीय असावा (तेव्हा भाजप वगैरे सर्वपक्षीय खिचडीचा पक्ष जन्माला आला नव्हता). म्हणजे शाखांमध्ये जाणे यांसारख्या रोजच्या दिवसाच्या नियमात बसवून घ्यायच्या प्रकारात त्याला रस नव्हता, पण शिवाजी पार्कवरच्या सभांना तो हटकून असायचा. कॉलेजच्या निवडणुकांमध्ये तर तो हिरीरीने भाग घ्यायचा. एका वर्गाच्या मुख्याची (म्हणजे मॉनिटर असायचा शाळेत त्या दर्जाची) निवडणूक होती. त्यातल्या एका उमेदवाराला त्याने वचन दिलं होतं… “नाव आज मागे घे. मी पुढच्या दहा वर्षांत तुला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करतो.” त्याच्या रक्तातच थोडा विलक्षणपणा होता. म्हणजे त्याच्या वडिलांनी एकदा महिन्याचा पगार सुटय़ा नाण्यांत हवा म्हणून अर्ज केला आणि ती रक्कम ते एका टॅक्सीत टाकून घेऊन आले होते… चांगली दोन पोती भरून. त्याचा स्वतचा असा स्टाफ होता (म्हणजे जरा ज्युनियर मुलं). त्यांना तो त्याच्या इतर कामांना पिटाळत असायचा. तिकिटे काढून आणणे, वडापाव घेऊन येणे इत्यादी आणि ती मुलंही काहीतरी दिव्य गोष्ट करत असल्याचे भाव डोळ्यांत ठेवून ती सगळी कामं करायची. त्यातल्याच एका मुलाचा अचानक प्रेमभंग झाला. त्या मुलीचे वडील डॉक्टर होते. त्यांना बिचाऱयांना हे प्रेमभंग वगैरे काहीही माहीत नव्हतं.
“त्या मुलीच्या बापाला धडा शिकवायचाय?” त्याने विचारलं.
प्रेमभंगी मुलाच्या तत्काळ होकारानंतर त्याने तिचा घरचा फोन नंबर मागितला.
रात्री दोनच्या सुमारास तो खणखणला.
“हॅलो? कोण बोलतंय?” बापाने काळजीयुक्त स्वरात विचारणा केली.
“डॉक्टर, तुम्हाला टाके घालता येतात?” याने विचारलं.
“काय झालंय?कोण बोलताय?”
“आमच्या पाटय़ाला टाके घालायचेत.”
डॉक्टरांनी शिव्या हासडत फोन बंद केला. सूड पूर्ण झाल्याच्या आनंदात पुढे त्या प्रेमभंग झालेल्या मुलाने सात वर्षांनी लग्न केलं. योगायोग असा की, ते त्याच मुलीशी झालं. त्या लग्नात हा विलक्षण वरपित्यापेक्षा जास्त टेचात फिरत होता. आजपर्यंत तो फोन कुणाचा, कुणी केला हे गुपित काळजात जपून ठेवलेलं आहे. चित्रपट बघायला गेल्यानंतर पडद्यावर पाऊस पडला की, हा थेटरात छत्री उघडायचा. कोणी आक्षेप घेतला की,
“बघा… किती पाऊस पडतोय समोर पडद्यावर! भिजलो आणि सर्दीताप आला तर? गाणं संपलं की, बंद करतो.” हे उत्तर. या सगळ्यातून पार पडून तो इंजिनीअर झाला… उत्तम मार्क्स मिळवून! नंतर पार टोकाला सिक्कीम की कुठेतरी जाऊन त्याने नोकरी केली. मग स्वतचा व्यवसाय सुरू केला, भरपूर पैसे मिळवले. तिथे असताना तो एकदा मला भेटायला आला होता. प्रयोग संपल्यावर म्हणाला, “बसू या.” आम्ही दोघे बसलो.
“हा लाईटर कोणाचा असेल?”
“मला कसं माहीत असणार? मी कसं ओळखणार ना?”
“ही अक्षरं बघून अंदाज बांध!” त्याने लाईटर दाखवला त्यावर ‘बी.पी.’ असं इंग्रजीत लिहिलेलं होतं. आता त्या दोन अक्षरांवरून साठ-सत्तर कोटी लोकसंख्येतल्या नेमका कुणाचा हे कसं कोण सांगू शकेल? (तेव्हा भारताची तितकीच लोकसंख्या होती. आता कार्यक्षमता दाखवून जनतेने ती शंभरच्या पुढे नेऊन ठेवली आहे).
“आसामच्या गृहमंत्र्यांचा आहे हा.”
“तुझ्याकडे कसा काय?”
“त्यांच्या मुलाची अॅडमिशन करून देतोय मी.” विलक्षणने थंड स्वरात सांगितलं.
“तू का?” माझा बावळट प्रश्न.
“माझी ओळख जास्त वरपर्यंत आहे.”
जवळपास कधीही कॉलेजला न जाता इंजिनीअर होणाऱया माणसाची ओळख आसामच्या गृहमंत्र्यापेक्षा वरची कशी असू शकेल? पण विलक्षणची हीच तर गंमत आहे.
[email protected]





























































