प्रॉमिसिंग – संगीतकारांची ‘भारी’ जोडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> गणेश आचवल

‘बाईपण भारी देवा’ या मराठी चित्रपटाने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला आहे. या चित्रपटाची संगीतकार जोडी ‘साई-पीयूष’ गेली दहा वर्षे या क्षेत्रात आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याशी साधलेला संवाद.

आपल्या चित्रपट संगीत क्षेत्रात अनेक संगीतकारांच्या जोडय़ा प्रसिद्ध आहेत. तरुण संगीतकार साई आणि पीयूष ही जोडी त्यापैकीच एक. साई म्हणजे साई निंबाळकर आणि पीयूष म्हणजे पीयूष कुलकर्णी. दोघेही पुण्याचे आहेत. पुण्यात आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांच्या निमित्ताने त्यांची ओळख झाली. पुढे मग दोघांनीही मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये प्रवेश घेतला आणि ते दोघे एकत्र विविध स्पर्धांत भाग घेऊ लागले. पुढे त्यांनी त्यांचा बँडसुद्धा सुरू केला होता. ‘मिशन पॉसिबल’ या चित्रपटाला दोघांनी संगीत दिले होते. मग केदार शिंदे यांची ओळख झाल्यावर केदार यांच्या अनेक प्रोजेक्टकरिता साई आणि पीयूष ही संगीतकार जोडी काम करू लागली.

साई म्हणतो, ‘‘केदार शिंदे यांचे आमच्याशी असलेले नाते भावासारखे आहे. त्यांच्या अनेक नाटकांना आणि चित्रपटांना आम्ही संगीत दिले आहे. आमच्या कामाची पद्धत त्यांना माहीत आहे. केदार सर हक्काने एखाद्या प्रोजेक्टसाठी आम्हाला फोन करतात. आम्ही त्यांच्या कुटुंबाचाच एक भाग आहोत.’’

‘बाईपण भारी देवा’मधले मंगळागौर गीत सध्या खूप ट्रेंडिंग आहे. पीयूष म्हणतो, ‘‘आपल्याकडे मंगळागौरीची पारंपरिक गीते आहेत. त्यातील कोणती गीते घेऊन त्या गीतांना आजच्या काळातील संगीतात कसे गुंफता येईल याचा आम्ही विचार केला, त्याचा अभ्यास केला. मंगळागौरीचे जे खेळ खेळले जातात, ते पाच मिनिटांच्या गाण्यात बसवणे हे आव्हान होते. पारंपरिकता आणि आधुनिकता यांचा मेळ घालण्याचा यातून आम्ही प्रयत्न केला.’’ ‘बाईपण भारी देवा’ हे शीर्षक गीतदेखील लोकप्रिय झाले आहे पीयूष म्हणतो, ‘‘मुळात चित्रपटाचा विषय वैश्विक आहे आणि त्यामुळे शीर्षक गीत करताना ते सर्व महिलांना जोडून घेईल, असा विचार आम्ही केला.