
गणेशोत्सव अवघ्या महिन्यावर आल्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मोठय़ा मूर्तींचे मंडपाकडे प्रस्थान सुरू झाले असताना रस्त्यावर खड्डे आणि धोकादायक फांद्या ‘जैसे थे’च असल्यामुळे मंडळे अडचणीत सापडली आहेत. मात्र आता रस्त्यावरील सर्व खड्डे बुजवणे आणि अडथळा ठरणाऱया फांद्या हटवण्याची कार्यवाही दोन ते चार दिवसांत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता मात्र बाप्पाचे आगमन खड्डेमुक्त होणार आहे. याबाबत दैनिक ‘सामना’मध्ये गुरुवारी ‘बाप्पांच्या आगमनात खड्डय़ांची रांगोळी’ असे वृत्त प्रसिद्ध झाले होते.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून मोठय़ा मूर्ती साकारल्या जात असल्यामुळे आणि मंडपामध्ये चलचित्र, देखावे साकारले जात असल्यामुळे सुमारे एक ते दीड महिना आधीपासून गणेश मूर्ती मंडपामध्ये नेणे आवश्यक असते. यामुळे बाप्पांचे आगमन मार्ग सुस्थितीत असणे आवश्यक होते. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन आणि सार्वजनिक गणेशोत्सव समितीच्या बैठकीत चर्चा झाली होती. यानुसार पालिका प्रशासनाने कार्यवाही करणे आवश्यक होते. मात्र अनेक आगमन मार्गांवर अजूनही खड्डे आणि झाडाच्या फांद्या असल्याने मूर्ती नेणे मुश्कील बनले आहे. लालबाग, परळ आदी ठिकाणच्या गणेश चित्रशाळांमधून गेल्या दोन आठवडय़ांपासून या गणेशमूर्तींचे मंडपाकडे प्रस्थान सुरू झाले आहे. यामुळे हा प्रश्न प्रकर्षाने समोर आला आहे. त्यामुळे मंडळांनी आधी मार्गाची पाहणी करावी आणि समन्वय समितीकडे पाठपुराव्यासाठी संपर्क करण्याचे आवाहनही करण्यात आले होते.
आतापर्यंत 509 मंडळांना परवानगी
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना उत्सवासाठी पालिकेची रीतसर अर्ज करून परवानगी घ्यावी लागते. यानुसार 1 ऑगस्टपासून ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली आहे.
यानुसार आतापर्यंत पालिकेकडे एकूण 959 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी परवानगीसाठी अर्ज केले आहेत. यापैकी 509 मंडळांना परवानगी देण्यात आली आहे.
तर अटींची पूर्तता केली नसल्याने 20 मंडळांना परवानगी नाकारण्यात आली आहे. तर उर्वरित अर्ज परवानगीच्या प्रक्रियेत असल्याची माहिती पालिकेने दिली.
अशी आहे समस्या…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, परळ नाका ते काळाचौकी नाका या मार्गावर दुतर्फा झाडांच्या फांद्या धोकादायकरीत्या रस्त्यावर आल्याने मूर्ती नेण्यात अडथळा येत होता. शिवाय पूर्व आणि पश्चिम उपनगरातील आगमन मार्गांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. रस्त्यांचे समतलीकरण नसल्याने मूर्ती नेण्यात अडथळे येत आहेत.

























































