लेन्स आय – ‘मसाईमारा’च्या जंगलात…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> ऋता कळमणकर

एका सुंदर सकाळी गोल्डन लाइटमध्ये आम्ही मसाईमाराच्या जंगलात मार्श प्राइड या सिंहाच्या समूहाचे छायाचित्रण करत होतो. एका समूहात काही वेळा दोन नर असतात किंवा एक नर असतो. तीन ते चार माद्या असतात. एक सिंहीण हजर नसेल तर दुसरी सिंहीण तिच्या पिलांची काळजी घेते. एका मोठ्या कुटुंबाप्रमाणे ते राहतात. आमच्या समोर कोवळय़ा सूर्यप्रकाशात एक सिंह, दोन सिंहिणी व एक छावा बसले होते. बाकी समूह झाडाखाली विश्रांती घेत होता. कोवळय़ा सूर्यप्रकाशात खूप सुंदर असे हे दृश्य होते. सूर्यकिरणांमुळे सिंहांची कातडी झळाळून उठली होती. एक छावा त्याच्या आईच्या अंगावरून इकडून तिकडे उडय़ा मारत मध्येच दूर उभ्या असलेल्या वाहनांकडे अतिशय चिकित्सक नजरेने बघत होता.

इतक्यात आमच्या गाडीच्या पाठीमागे एकदम गडबड ऐकू आली. पाहतो तर बिबळय़ाची मादी रानटी डुकराचा पाठलाग करत होती. खूपच धांदल उडाली. फार चांगले फोटो मिळू शकले नाहीत त्याची हुरहुर वाटत राहिली. पुन्हा सिंहाच्या प्राइडकडे वळलो. परत थोडे फोटो काढले आणि परत जाण्यासाठी वळलो. अगदी थोडय़ा अंतरावर एका स्थानिक माणसाने आमच्या ड्रायव्हरला स्वाहिली भाषेत काही सांगितले आणि ते दोघे जवळच्या झाडाकडे पाहू लागले. आम्ही वर पाहिले तर साधारण एक ते दीड वर्ष वयाचा बिबळय़ा झाडावर बसला होता. त्याची आई शिकारीसाठी बाहेर पडलेली आम्ही नुकतीच पाहिली होती. तिचे ओरडणे ऐकू येत होते. आमच्या ड्रायव्हरने सांगितले की, ती तिच्या बछडय़ाला बोलावत आहे, परंतु खाली सिंहाची मार्श प्राइड असल्यामुळे तो झाडाखाली उतरू शकत नव्हता. त्यामुळे तो अडकून पडला होता. त्यातच त्याने दोनवेळा उतरण्याचा प्रयत्न केला, पण पुन्हा बसून राहिला. मोठय़ा फांदीवर उभा राहून तो लांब त्याला दिसणाऱया त्याच्या आईकडे पाहत होता.

त्यादरम्यान मला त्याचे छान फोटो मिळाले. 200-400 एमएम निकॉन लेन्स वापरून जास्तीत जास्त फोटो काढण्याचा प्रयत्न केला. तोवर सिंहाची प्राइड निवांत झोपली होती. मग तिसऱया प्रयत्नांत बिबळय़ा झाडावर मागच्या बाजूने लपतछपत उतरला आणि झाडीत नाहीसा झाला. आम्हीही मग ब्रेकफास्टसाठी हॉटेलवर परतलो. माझ्या संग्रही माझा पहिला बिबळय़ाचा फोटो आला होता व बोनस म्हणून सिंहिणीचे पिल्लू तिच्या पाठीवर प्रेमाने बसलेल्या माय-लेकराचा फोटो मिळाला.

फोटोग्राफी म्हणजे सर्व योग्य लाइटचा खेळ, सकाळची कोवळी किरणे निसर्गाला अधिकच रम्य व प्रफुल्लित बनवतात. संध्याकाळची ड्रमॅटिक लाइट आणि समोर तुमचा आवडता प्राणी, पक्षी. मला वाटते, छायाचित्रकारासाठी यापेक्षा सुख ते कोणते. मग मिळालेल्या संधीचे सोने होते.

[email protected]