रंगपट – संवेदनशील वाटेवरचा प्रवास…!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाटकाच्या दौऱ्यात अनुभवलेला एक हृदयस्पर्शी प्रसंग सांगत आहेत, ज्येष्ठ नाटय़निर्माते संदीप विचारे…

आमचा दौरा असायचा तेव्हा सकाळच्या वेळेत आराम करणे, दुपारी जवळपासची ठिकाणे पाहणे आणि रात्री प्रयोग; असा आमचा बेत असे. असाच एका दौऱयावरचा एक प्रसंग मला आठवतो. साधारण सोळा-सतरा वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. आमच्या ‘पती सगळे उचापती’ या नाटकाचा विदर्भात दौरा होता. नक्की ठिकाणच सांगायचे, तर ते म्हणजे तिथले कारंजा. अभिनेते कुलदीप पवार, चेतन दळवी असे नामवंत कलाकार आमच्यासोबत होते. कुलदीप पवार यांना सगळे ‘डॅडी’ म्हणत असत. मी माझा एक कलाकार स्नेही अनिल गावडे याला सोबत घेऊन मी ते गाव पाहायला निघालो.

इतक्यात कुलदीप पवार यांना, त्यांच्या मातोश्रींचे निधन झाल्याची बातमी कोल्हापूरहून त्यांच्या मोबाईलवर आली. बातमी ऐकताच ते तडक त्यांच्या खोलीत गेले. थोडय़ा वेळाने त्यांनी मला त्यांच्या खोलीत बोलावले आणि ते म्हणाले, ‘कोल्हापूरला जायला किती वेळ लागेल? किती अंतर असेल? सकाळी अंत्यविधी आहे. काहीही कर, पण मला कुठल्याही परिस्थितीत सकाळपर्यंत कोल्हापूरला घेऊन चल.’ त्या काळात मोबाईल होते; पण स्मार्ट फोन नव्हते. आमच्या हॉटेलच्या मॅनेजरने लगेच भाडय़ाच्या गाडीसाठी फोनाफोनी सुरू केली. पण दुर्दैवाने भाडय़ाची गाडी गावात उपलब्ध नव्हती.

इतक्यात मला तो दुपारचा रिक्षावाला आठवला. सुदैवाने मी त्याचा नंबर घेतला होता. मी त्याला फोन केला. दहा मिनिटांत तो रिक्षावाला स्वतः एक ‘फोर व्हिलर’ घेऊन हॉटेलमध्ये हजर झाला. मी डॅडींना खाली बोलावले.

कारंजातून निघताना काही लोकांकडून कारंजा ते कोल्हापूर या रस्त्याची जुजबी माहिती आम्ही घेतली होती. कोल्हापुरात पोहोचेपर्यंत अनेक अडचणी आल्या. टायर पंक्चर झाला. रस्ता नीट कळत नव्हता. मध्ये एक जंक्शन लागले. त्यावर कुठल्याही पाटय़ा नव्हत्या. तिथल्या एका मित्राला फोन लावला. त्याने अंदाजाने रस्ता सांगितला. थोडे पुढे गेल्यावर कोल्हापूर नजरेच्या टप्प्यात आले होते.

डॅडींनी एका ढाब्यावर गाडी थांबवायला सांगितली. आम्ही सगळे उतरलो. मात्र आतापर्यंत शांत असणाऱया डॅडींच्या संयमाचा बांध आता फुटला. ते मला मिठी मारून ढसाढसा रडू लागले. मराठी चित्रपटसृष्टीतला एक कणखर असा खलनायक; आज आपल्या आईसाठी इतका हळवा झाला होता. वरवर कठोर दिसणाऱया डॅडींचे हृदय असे मेणाहून मऊ होते आणि त्याचा साक्षात्कार आम्हाला त्या दिवशी झाला. शेवटी आम्ही सगळे एकदाचे कोल्हापूरला पोहचलो. ‘आईचे कार्य झाले की थोडा वेळ आराम करून, बाकीचे प्रयोग करायला आपण पुन्हा कारंजाकडे निघायचे,’ असे गाडीतून उतरताच डॅडी मला म्हणाले आणि वळून चालू लागले. मी डॅडींच्या त्या पाठमोऱया आकृतीकडे पाहतच राहिलो.

शब्दांकन – राज चिंचणकर