
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात अवमानजनक विधान केल्याप्रकरणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन पुकारले होते. वळसे पाटील यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिला.
उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी रविवारी एका कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांना एकदाही स्वबळावर मुख्यमंत्री होता आले नाही, असे विधान केले होते. या विधानाचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने तीव्र निषेध केला. पक्षाच्या प्रदेश कार्यालयासमोर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष नीलेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
मी चुकीचे बोललो नाही – वळसे पाटील
दरम्यान, माझ्या भाषणात मी कुठेही शरद पवार यांच्यावर टीका किंवा काही चुकीचे बोललो नाही, असा खुलासा दिलीप वळसे पाटील यांनी आज ट्विट करून केला. शरद पवार यांच्याबद्दल कुठलीही टीका तसेच चुकीचा शब्द जाणे शक्य नाही. तरीसुद्धा हा जो गैरसमज निर्माण झालेला आहे त्याबद्दल आपण दिलगिरी व्यक्त केली आहे. एवढा मोठा उत्तुंग नेता असताना महाराष्ट्राच्या जनतेने त्यांच्या पाठीशी उभे राहायला हवे होते. ते घडले नाही त्याबद्दलची खंत मी बोलून दाखवली, असे वळसे पाटील यांनी म्हटले आहे.




























































