दुबईला जायला निघाला अन् तुरुंगात गेला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चोरीच्या गुन्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱयाला अखेर समतानगर पोलिसांनी अटक केली. विश्वजित जाना असे त्याचे नाव आहे. तो दुबई येथे नोकरीसाठी जात असताना त्याला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ताब्यात घेऊन अटक केली.

विक्रोळी येथे व्यावसायिक राहतो त्याचा भागीदारीत सोन्याचा व्यवसाय आहे. त्याच्या कारखान्यात एकूण 16 कामगार होते. तीन वर्षांपूर्वी त्याचा एक भागीदार हा गोरेगाव पूर्व येथील कारखान्यातून सोने घेऊन आला. ते रिफायनिंग केलेले सोने कमी असल्याचा संशय व्यावसायिकाला आला. त्यामुळे त्याने कारखान्यातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तेव्हा चार जण काही प्रमाणात सोने पाकिटात टाकत असल्याचे फुटेजमध्ये दिसले. सोने चोरी प्रकरणी त्याने समतानगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला.

तपासादरम्यान पोलिसांनी तिघांना अटक केली. त्यांच्या चौकशीत विश्वजितचे नाव समोर आले. पोलीस पकडतील म्हणून तो पश्चिम बंगाल येथे मूळ गावी न जाता हुबळी येथे गेला. तेथे तो बांधकामाच्या ठिकाणी तीन वर्षे मजूर म्हणून काम करू लागला.

तीन वर्षांत पोलिसांचा तपास थंड पडला असेल असे विश्वजितला वाटले. काही महिन्यांपूर्वी विश्वजितने त्याच्या एका मित्राला फोन केला. तेव्हा दुबई येथे सोने कारागीराची नोकरी असल्याचे त्याला सांगण्यात आले. परदेशात नोकरी मिळेल या हेतूने विश्वजित हा हुबळी येथून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला. विश्वजित हा विमानतळावर आल्याची माहिती समतानगर पोलिसांना मिळाली. वरिष्ठ निरीक्षक प्रवीण राणे यांच्या पथकातील उपनिरीक्षक रावसाहेब शिंदे, विजय पवार, सावंत यांच्या पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी विमानतळावर सापळा रचून अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. विश्वजितने ते सोने कोणाला दिले याचा तपास समतानगर पोलीस करत आहेत.