हरेगाव मारहाणप्रकरणी आणखी तिघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कबुतरे चोरीच्या संशयावरून हरेगाव येथील चार  दलित तरुणांना अर्धनग्न करून झाडाला उलटे टांगून मारहाण केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने व स्थानिक पोलिसांनी आज आणखी तीन आरोपींना अटक केली असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. याप्रकरणी आत्तापर्यंत सहा आरोपींना अटक केली आहे.

दुर्गेश वैद्य, पप्पू पारखे आणि राजू बोरगे यांना आज अटक केली आहे. हरेगाव येथील चार तरुणांना मारहाण केल्याप्रकरणी युवराज गलांडे, मनोज बोडखे, दीपक गायकवाड यांना अटक करण्यात आली होती. सोमवारी रात्री स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने नगर येथून दुर्गेश वैद्य याला, तर स्थानिक पोलिसांनी नेवासा येथून राजू बोरगे याला अटक केली आहे. तसेच पप्पू पारखे यालाही पोलिसांनी अटक केली आहे.

रविवारी अटक केलेल्या दीपक गायकवाड याची पोलीस कोठडी आज संपत आहे, तर युवराज गलांडे, मनोज बोडखे, पप्पू पारखे, दीपक गायकवाड, दुर्गेश वैद्य, राजू बोरगे या पाच जणांना 2 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, तर नाना गलांडे हा अद्यापही पसार असून, शोध सुरू असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक डॉ. बसवराज शिवपुजे यांनी दिली आहे. पोलीस पथके आरोपींच्या मागावर आहेत.

मारहाणीचा खटला जलदगती न्यायालयात चालवा – हंडोरे

हरेगाव येथील मारहाण झालेले युवक हे अल्पवयीन असून, गलांडे याच्यासह त्याच्या साथीदारांविरोधात पोस्कोसह मकोका कायद्यान्वये कारवाई करून हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, अशी मागणी भीमशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी आज केली. हरेगाव घटनेच्या पार्श्वभूमीवर हंडोरे यांनी आज साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या जखमी युवकांची भेट घेतली. यावेळी बाबासाहेब दिघे, सचिन गुजर, अशोक कानडे, संदीप मगर, प्रल्हाद शिंदे, सुनील शिरसाठ, सुदाम सरोदे, चंद्रकांत कर्डक आदी उपस्थित होते.