
गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे पाथर्डी तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने तातडीने दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आली. याबाबत तहसीलदार श्याम वाडकर यांना निवेदन देण्यात आल्यानंतर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
शिवसेना तालुकाप्रमुख भगवान दराडे, भाऊसाहेब धस, रामकिसन भिसे, केशव खेडकर, शिवाजी माळी, रामदास दराडे, चंद्रकांत शेळके, बबन शेळके, अनिल खेडकर, आदिनाथ भापकर, विकास दिनकर, आजिनाथ गीते, शिवनाथ सापते, बाळासाहेब केंदळे, विक्रम आव्हाड, आदम पठाण, ईलाल पठाण, मोसीन पठाण, साहेबराव काळे, बबन चव्हाण यावेळी उपस्थित होते.
भगवान दराडे म्हणाले, अनेक दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्यामुळे तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तरीही राज्य शासन तालुक्यात दुष्काळ जाहीर करत नाही. पाथर्डी तालुका तातडीने दुष्काळी जाहीर करून जनावरांसाठी छावण्या सुरू कराव्यात, ज्या गावात गरज आहे तेथे टँकर सुरू करावा. सध्या पावसाने पाठ फिरवल्याने खरीप पिके वाया गेली आहेत. शेतकऱयांनी शेतात खते टाकली, मात्र पाऊस नसल्याने दुबार पेरणीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी करत तहसीलदार वाडकर यांना निवेदन देण्यात आले.

























































