
>> डॉ. मुकुंद कुळे
लोकरहाटीतल्या श्रद्धा निसर्गातल्या प्रत्येक जीवाशी जोडलेल्या असतात. त्यातीलच एक म्हणजे नाग. आपण लहानपणी नागकथा ऐकतोच. या कथांमधून, सणांमधून त्याला दिलं गेलेलं मनुष्यत्व आपण नाकारत नाही. वारूळ आणि नाग हे समीकरण लोकसंस्कृतीत छान रुजलंय. वारूळ हे सर्जनशील भूमिरूपाचं, स्त्रीतत्त्वाचं प्रतीक, तर नाग हे पुरुषतत्वाचं, चैतन्याचं प्रतीक. म्हणूनच आजही हिंदुस्थानी ग्रामीण महिलांची श्रद्धा आहे की, नाग हा त्यांचा भाऊ तरी आहे किंवा प्रियकर तरी. त्यामुळे शेतात, रानात, वाटेत कुठेही वारूळ दिसलं की, त्या आदराने नमस्कार करतात.
नुकतीच नागपंचमी झाली. लहानपणी श्रावणात कधीतरी गावाला असताना आईबरोबर नाग पुजायला गेलो होतो. गावाबाहेर नदीच्या काठावर कळकीचं बेट होतं. त्या बेटात कंबरभर उंचीचं आडवं पसरलेलं वारूळ होतं. लालभोर मातीचं. आडव्या पसरलेल्या त्या वारुळात लहान-मोठय़ा उंचीची आठ-दहा शिखरं होती. आईसकट जमलेल्या सगळ्या आयाबायांनी पूजा करून वारुळावर लाह्या-फुलं उधळली, लोटीत आणलेलं दूध वेगवेगळ्या शिखरांत ओतलं अन् नंतर वारुळाभोवती फेर धरून साऱयाजणी गाणी म्हणू लागल्या. गाणी रंगात आलेली असतानाच वारुळातल्या एका शिखरात काहीतरी हालचाल दिसली. थोडय़ाच वेळात दहाचा आकडा असलेला फडा उभारून काळा कुळकुळीत नाग बाहेर आला. मी घाबरून पटकन आईला बिलगलो. तसं लोकरहाटीतल्या श्रद्धेला जागून ती लगेच म्हणाली, “घाबरू नको. आम्हा बह्यणीना भेटाय आलाय तो. आलाय तसा जाईल. ज्यांना भाऊ नसतो, त्यांना तोच तर येतो माघारी म्हणून…” त्यानंतर आई कितीतरी गोष्टी सांगत राहिली. नागाच्या माणूसपणाच्या! कधी तो भाऊ म्हणून कसा येतो, तर कधी प्रियकर म्हणून कसा येतो, त्याच्याही!
त्यातील एक गोष्ट अजून आठवते. नवीनच लग्न झालेली एक सासुरवाशीण नागपंचमीच्या पहिल्याच सणाला तिला माहेरपणाला न्यायला कोण येतंय, त्याची वाट पाहत असते. तिच्या सगळ्या मोठय़ा जावांना त्यांचे त्यांचे भाऊ येऊन घेऊन जातात. धाकटीला भाऊ नसतो, ती तशीच वाट बघत बसून असते. तेव्हा तिची सासू तिला कुत्सितपणे म्हणते, “धाकटे, तुला गो कोण येईल माहेरपणाला न्यायला?” तेव्हा ती धाकटी सून पटकन म्हणून जाते, “येईल माझा लांडोबा-पांडोबा…” आणि थोडय़ा वेळाने खरंच लांडोबा-पांडोबा तिला न्यायला येतो. ती पण त्याच्याबरोबर जायला निघते आणि वाटेत त्याला “तू कोण?” म्हणून विचारते, तर तिथे नाग आपलं खरं रूप उघड करतो, परंतु त्याला न घाबरता धाकटी त्या लांडोबा-पांडोबाला नमस्कार करते आणि त्याच्या पाठोपाठ चालू लागते. जणू पुढे सरसर वाट काढत जाणारा भाऊराया आणि त्याच्या मागे मागे चालणारी लाडाची बहिणाबाई.
असंच एक तिने मळगराचं (नागाचं संबोधन) गाणं सांगितलेलं. यातला मळगर चांगुणा नावाच्या स्त्राrवर लुब्ध झालेला. चांगुणा नदीवर आली की, तो तिच्या पाठराखणीला यायचा. अशीच पाठराखण करत आणि माग काढत एक दिवस तो तिच्या घरी जातो-
चांगुणा आली रस्त्यावर नि
मळगर आला बांधावर
चांगुणा आली अंगण्यात नि
मळगर आला रस्त्यावर
चांगुणा आली पडवीत नि
मळगर आला अंगणात
चांगुणा चढली वटीवर नि
मळगर आला पडवीत
चांगुणा शिरली घरात नि
मळगर आला वटीवर…
तर ओटीवर बसून हा मळगर चांगुणा बाहेर यायची वाट पाहू लागला. बहुधा त्याच्या अस्तित्वाची चाहूल लागल्यामुळेच की काय, चांगुणाही सैरभैर होते. तिचं दळणकांडण, स्वैपाकात… कशातच लक्ष लागत नाही. तिचं हे सैरभैरपण सासूच्या लक्षात येतं. ती तिला टोकते तेव्हा तेच निमित्त करून चिडून चांगुणा बाहेर येते, तर तिथे आढय़ात लपून बसलेला मळगर तिला घेऊन पसार होतो. त्याच्या पाठोपाठ रानातून चालताना चांगुणा थकते. पायातल्या जोडवीमुळे तिचे पाय जडावतात, तर तो मळगर तिला म्हणतो की, जोडवी काढून टाक. माझ्या घरी कशालाच कमी नाही. तिथे ती चांगुणा आपलं सौभाग्याचं लेणं असलेली जोडवी काढून टाकते. जणू आधीच्या विवाहबंधनातून मुक्त होते.
तेव्हापासून नाग हा माझ्या कल्पनासृष्टीतला एक अविभाज्य घटक झालाय. तो मला सर्पकुळातला वाटतच नाही. आपल्यासारखाच हाडामांसाचा माणूस वाटतो. अर्थात हे झालं लोककथा आणि लोकगीताच्या माध्यमातून मला घडलेलं नागदर्शन, पण आईचं नागपुराण तिथेच संपलं नाही. जरा जाणता झाल्यावर तिने आमच्या घराला असलेल्या नागवलयाच्या कथाही ऐकवायला सुरुवात केली. आमच्या घरापासून आगरापर्यंत (नारळी-पोफळीची बाग) असलेल्या नागाच्या भ्रमणकथाही ती सांगायची. सकाळी देवघरात दिसलेला नाग दुपारी आगरात कसा दिसायचा आणि कुणी परका माणूस आगरात शिरल्यावर नाग त्याची वाट कसा रोखायचा, याचे अनेक किस्से तिच्या पोतडीत होते. एकदा म्हणाली, “बब्या नं एका सणाला मी आंघोळ करून देव पुजायला देवखोलीत गेला, तर आपल्या देवावर नागान् फडा धरलेली. मी वळखली त्याला. आपल्या घराचा-दाराचा राखणदार व्हता तो. मी त्याला म्हटला, अशीच नजर ठेव आणि आल्या वाटंन जा… तसा तो गेला निघून.”
नाग हा तिच्यासाठी कुणी सरपटणारा प्राणी नव्हताच. तिच्यासाठी तो देव तर होताच, पण त्याही आधी तिचा भाऊराया होता. “आम्हा सात बहिणींच्या पाठीवर झालेला भाऊराया देवान् नेला अन् याला दिला धाडून,” असं ती नागाविषयी बोलायची. त्यामुळेच तिला नागाची कधी भीती वाटली नाही. कधी दिसलाच वाटेत नाग, तर त्याला हात जोडून काहीतरी पुटपुटायची, त्याच्या कानात काहीतरी सांगितल्यासारखी. विशेष म्हणजे मग नागही गपगुमान निघून जायचा उभारलेला फडा खाली करून.
तर अशा आईने सांगितलेल्या या नागकथा खऱया की खोटय़ा, ठाऊक नाही, किंबहुना, वास्तवापेक्षा त्यांना अवास्तवाचा आधारच अधिक असण्याची शक्यता जास्त, पण या कथांमागे आईने असलं काही भावबळ उभं केलेलं आहे की, त्या नाकाराव्यात असं मला कधी वाटलंच नाही. त्यामुळेच नाग हा माझ्या भावप्रांतातला जिवंत माणूसच आहे. तो माझ्यासाठी कुणाच्या तरी घरादाराचा राखणदार आहे, तो माझ्यासाठी कुणातरी बहिणीचा भाऊ आहे आणि तो माझ्यासाठी कुणातरी प्रेयसीचा प्रियकरदेखील आहे!
तो दिसला की, त्याची भीती नक्कीच वाटते, तरीही त्याला पाहायचा मोह मात्र आवरत नाही. जिथे कुठे त्याचं दर्शन घडतं, वाटत राहतं, तो कुणाला तरी संकेतस्थळी भेटायला आलाय किंवा कुणाला तरी माहेरपणाला न्यायला तरी. मग उगीचंच इकडे तिकडे पाहतो, त्याच्या अस्तित्वाच्या खुणा शोधत राहतो. खास करून त्याच्या वारुळाभोवती.
खरं तर वारूळ हे त्याचं घर नव्हेच. ते मुंग्यांनी केलेलं असतं, पण मुंग्यांनी केलेल्या आयत्या घरात, म्हणजे बिळात नाग जाऊन राहतो आणि तोच त्याचा स्वामी होतो. आता वारूळ आणि नाग हे समीकरण लोकसंस्कृतीत छान रुजलंय. वारूळ हे सर्जनशील भूमिरूपाचं, स्त्राrतत्त्वाचं प्रतीक, तर नाग हे पुरुषतत्त्वाचं, चैतन्याचं प्रतीक. म्हणूनच आजही हिंदुस्थानी ग्रामीण महिलांची श्रद्धा आहे की, नाग हा त्यांचा भाऊ तरी आहे किंवा प्रियकर तरी. त्यामुळे शेतात, रानात, वाटेत… कुठेही वारूळ दिसलं की, त्या आदराने नमस्कार करतात आणि आपल्या भाऊरायाचं कुशल चिंततात. तसंच त्याची कामनाही करतात.
नागाच्या या मनुष्यरूपाचा आईने लहानपणी माझ्यावर केलेला संस्कार अजून पुसला गेलेला नाही, पुसला जाणारही नाही कदाचित. कारण एक नागवलय मला सतत वेढून आहे. पत्रकारितेच्या कामानिमित्ताने कुठे कुठे भटकावं लागतं. कधी हौसेपोटीही भटकणं होतं. या भटकंतीत वाटेत कुठेही वारूळ दिसलं की, मी थांबतो. मग ते जंगलात असो वा शेतात आणि मग माझ्याही नकळत माझी पावलं त्या वारुळाकडे वळतात. वारुळाची आणि त्याच्या आत राहणाऱया त्याच्या मालकाची वास्तपुस्त करायला. खरं तर मनात प्रचंड भीती असते. कुठून नाग आला आणि चावला तर… याची. तरीही वारूळ दिसलं की, ते खोलवर निरखून पाहण्याचा मोह आवरत नाही.
मध्यंतरी खानापूरहून बेळगावकडे येत असताना वाटेवरच्या जंगलात एकदम दोन-तीन वारुळं दिसली आणि मी गाडी थांबवली. जवळ जाऊन ती मातीची वारुळं निरखू-पारखू लागलो. कुंभाराने जीव लावून मळलेल्या मातीला जशी तकाकी येते, तशी त्या वारुळाची माती होती. त्या वारुळांचे उंचवटे, म्हणजे शिखरं अतिशय सुरेख होती. अगदी आखीवरेखीव. नागाच्या डौलदार चालीला शोभतील अशी. माझं ते निरखणं सुरू असतानाच जवळच्या झुडुपात काहीतरी सळसळलं अन् भीतीने अंगावर काटा उभा राहिला. त्या भीतीचा मनातून निचरा होण्याआधीच पुन्हा झाडात सळसळ झाली. आवाजाचा मागोवा घेत तिकडे पाहिलं, तर एक काळाशार नाग तिथून जात होता. त्याच्या दर्शनाने मन सुन्न झालं. लगेच तिथून बाहेर पडण्याची घाईही झाली.
…अन् तरीही परवा अकलूजजवळच्या वेळापूरच्या वाटेवर शेतात दिसलेलं काळंभोर वारूळ पाहण्याचा मोह आवरला नाहीच. ते पाहण्यासाठी खाली उतरलोच. ते पाहताना उगाचंच वाटत राहिलं, या वारुळातला भाऊराया गेला असेल का कुणा बहिणाबाईला आणायला किंवा आपल्या प्रेयसीला भेटायला…
नाग दिसेल, न दिसेल… त्याचं वारूळ दिसलं की, आईने सांगितलेल्या त्याच्या माणूसपणाच्या गोष्टी आठवत राहतातच…!



























































