
आज तंत्रज्ञानाच्या जगात ईमेल आणि मेसेजद्वारे फसवणुकीचं प्रमाण वाढलं आहे. एखाद्या ऑफरची लालूच दाखवून किंवा पैसे दुप्पट मिळवून देण्याचं आश्वासन देऊन समोरच्याचा बँक बॅलन्स शून्य केला जातो. ही फसवणूक नेमकी कशी होते आणि त्यावर काय दक्षता घ्यावी, हे बऱ्याच जणांना माहीत नसतं.
सायबर चोरीत अशा प्रकाराला फिशिंग म्हटलं जातं. हा फिशिंग मेल किंवा मेसेज एकाचवेळी अनेकांना पाठवला जातो. त्यात एखाद्या नामांकित बँक किंवा मोठ्या कंपनीचा उल्लेख करून तुमची लकी ड्रॉमध्ये निवड झाल्याचं सांगितलं जातं. काही प्राथमिक माहिती भरल्यानंतर तुमच्या नावाने भली मोठी रक्कम जमा केली जाईल अशी लालूच दाखवण्यात येते. यात अगदी प्रत्यक्षात असणाऱ्या अस्सल साईटची हुबेहुब नक्कल करणारी खोटी वेबसाईटही तयार केली जाते. संपर्कासाठी मेल आणि नंबरही दिला जातो.
जर आपण त्याला रिप्लाय दिला तर आपल्याला एखादी किरकोळ रक्कम पाठवण्याची विनंती केली जाते. तसंच, आपली मूलभूत माहिती सांगण्यास सांगितली जाते. त्यात पॅन कार्ड नंबर, बँकेचं नाव, आयएफएससी कोड यांची माहितीही विचारली जाते. ही माहिती नेटबँकिंगसाठी आवश्यक असल्याचं भासवलं जातं. ती माहिती दिल्यानंतर परदेशी बँकेचं कमिशन किंवा काही अन्य खर्चासाठी सुमारे 1 ते 2 लाख रुपये इतकी रक्कम पाठवण्यास सांगितलं जातं. मोठी रक्कम मिळण्याच्या आशेने ही रक्कम पाठवल्यास मेल आणि फोन ताबडतोब बंद केले जातात. नंबर अनुपलब्ध होतो, मेल बाऊन्स होऊ लागतात. त्यानंतर फसवणूक झाल्याचं लक्षात येतं.
अशी फसवणूक होऊ नये म्हणून काय कराल?
अशा कोणत्याही मेसेज अगर मेलला प्रतिसाद देऊ नये. वारंवार मेल येत असल्यास सायबर क्राईम विभागाशी संपर्क साधावा.
आपल्या माहितीच्या वेबसाईटवरून मेल आला असल्यास, अन्य मार्गांनी कंपनीशी संपर्क साधून या प्रकाराची जाणीव करून द्यावी.
आपल्या बँकेचे व्यवहार ऑनलाईन पद्धतीने करताना आपला युजर आयडी, पासवर्ड, पिन नंबर, सीव्हीव्ही नंबर गुप्त राहील याची खबरदारी घ्यावी.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या जगात काहीही मोफत मिळत नाही, हा अर्थशास्त्रातील नियम लक्षात ठेवावा.
तसंच, एखादी वस्तू किंवा सेवा खरेदी करायची असल्यास आपल्याला पैसे देणं गरजेचं नसतं, हे पक्कं लक्षात ठेवा.
फसवणूक झालीच तर ताबडतोब सायबर क्राईम विभागाशी संपर्क साधावा.
























































