पोहायला गेलेल्या तीन युवकांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू, वांजरी येथील खळबळजनक घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रसाद नायगावकर, यवतमाळ 

यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहरातील तीन तरुण मुले मोपेड दुचाकीने वांजरी येथे गेले होते. तेथील पाण्याने तुडुंब भरलेल्या खदाणीत त्यांना पोहण्याचा मोह झाला.आणि त्याच वेळी नियतीने डाव साधला. पाण्याचा अंदाज न आल्याने तिन्ही युवक बुडाले. ही खळबळजनक घटना शनिवारी दुपारी घडली.

रविवारी पहाटेपासून शोधमोहीम राबवली असता तिघांचे मृतदेह आढळले. आसिम शेख (16), नुमान शेख (16, राहणार एकता नगर), प्रतीक संजय मडावी (16, रा. प्रगती नगर) असे या तिन्ही युवकांचे नाव आहे. घटनेच्या दिवशी मोपेड दुचाकीवरून तीन तरुण वंजारीला गेले होते. वांजरी गावालगत चुनखडीची मोठी खदान (खाण) आहे. त्यात पावसाचे पाणी साचून तलावाचे स्वरूप आले आहे. तिन्ही तरुण शनिवारी दुपारी त्या ठिकाणी पोहोचले. निसर्गरम्य स्थळ असल्याने त्यांनी काहीवेळ तेथे बसून गप्पा मारल्या. नंतर त्यांना पोहण्याचा मोह झाला. तिघांनी आपले कपडे, चप्पल व मोबाईल दुचाकीवर ठेवून साचलेल्या पाण्यात पोहायला उतरले.

पाण्याचा अंदाज न आल्याने ते तिघेही पाण्यात बुडाले. मात्र आजूबाजूला कोणीही नसल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सायंकाळी ही बाब उघडकीस आली. दुचाकीवर तिघांचे कपडे, चप्पल आढळून आल्याने प्रत्यक्षदर्शीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. घटना ग्रामस्थांना कळली आणि घटनास्थळी मोठी गर्दी झाली. या प्रकरणी पोलिसांना कळविण्यात आले. ठाणेदार अजित जाधव यांनी घटनेची तीव्रता लक्षात घेत तातडीने पोलीस कर्मचाऱ्याना वांजरीला रवाना केले. तो पर्यंत शहरातील नेते मंडळी घटनास्थळी दाखल झाले होते. रात्र झाल्यामुळे शोध घेता आला नाही. रविवारी पहाटे पोलिसांनी शोधमोहीम राबवली असता तिन्ही तरुणाचे मृतदेह आढळून आले आहे. पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.