
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील दहीहंडी उत्सावात सहभागी होत गोविंदा पथकांना प्रोत्साहन दिले. यावेळी त्यांनी दहीहंडीच्या शुभेच्छा दिल्या. मुंबईत झळकलेल्या काही बॅनर्सवरून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी खणखणीत उत्तर दिलं. तसंच बॅनरबाजीवर सुरू असलेल्या उधळपट्टीचा देखील त्यांनी समाचार घेतला. तसेच राज्यातील समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधत, बॅनरबाजी आणि पैशांची उधळपट्टी खूप झाली आता मुद्द्याचे आणि कामाचे बोला, अशा शब्दांत सत्ताधाऱ्यांना ठणकावले.
महाराष्ट्रात दुष्काळीची चिन्हे आहेत. त्यावर सरकारने बोलले पाहिजे. वरळीत परिवर्तन होईल, अमुक ठिकाणी तमुक होईल, अशी बॅनरबाजी खूप झाली. पैशांची उधळपट्टी खूप झाली. आता कामाचे बोला, मुद्द्याचे बोला. त्यांना पाहिजे तेवढी शक्ती लावू द्या, देशभक्ती आमच्याकडे आहे. जनता आमच्याबाजूने आहे. देशावर आक्रमण करणाऱ्या चीनबाबत, राज्यातील, देशातील प्रश्नांबाबत ते काहीही बोलत नाही. जनतेचे लक्ष विचलीत करण्याचे त्यामचे प्रयत्न सुरू आहेत, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढवला.
वरळीत परिवर्तनाचे बॅनर भाजप लावत आहे. त्यामुळे देशात परिवर्तन होणार आहे, हेच ते मान्य करत आहेत. ही चांगली बाब आहे. देशात आज लोकशाही राहिली आहे काय, असा प्रश्न उपस्थित करण्यासारखी परिस्थिती आहे. सणांच्या पार्श्वभूमीवर राजकारण करणे, हे बालिशपणाचे लक्षण आहे,ज्यांना बालिशपणा करायचा त्यांना त्यातच राहू द्या, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.
























































