Rain Update – मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक भागात पावसाची हजेरी; शेती पिकांना मिळाली नवसंजीवनी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑगस्ट महिना कोरडा गेल्यानंतर आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातही पावसाने हुलकावणी दिल्यानंतर आता गोपाळकाला अर्थात दहीहंडीच्या मुहूर्तावर राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली. गुरुवारी दिवसभर आणि शुक्रवारी सकाळीही पावसाची संततधार सुरू राहिल्याने उकाडा कमी झाला असून शेती पिकांनाही नवसंजीवनी मिळाली आहे. मात्र राज्यातील अनेक जिल्ह्यांना आजही पावसाची प्रतिक्षा आहे.

मुंबईमध्ये गुरुवारी आकाशात ढगांनी गर्दी केली होती. दिवसभर हलक्या व मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळत होता. बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई शहरामध्ये गेल्या 24 तासांमध्ये (काल सकाळी 8 ते आज सकाळी 8) 65.36 मिमी. पावसाची नोंद झाली आहे. मुंबई शहरासह उपनगरांमध्येही चांगला पाऊस पडला. उपनगरांमध्ये 89.08 तर पश्चिम उपनगरामध्ये 96.69 मिनी पाऊस पडला. आजही मुंबई शहर आणि उपनगरात आकाश साधारणत: ढगाळ राहून मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.


मुंबईसह पुण्यामध्ये पहाटेपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे पुणेकरांना उकाड्यापासून काहिसा दिलासा मिळाला. पावसाने अचानक लावलेल्या हजेरीमुळे सकाळी कामासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा, खान्देशातील काही भागामध्येही पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे माना टाकलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाली.

दरम्यान, ओडिशा आणि छत्तीसगड येथे असलेली चक्रिय वात स्थिती, पूर्व-पश्चिम कमी दाबाचे क्षेत्र, अरबी समुद्रावरून येणारे वारे आणि मान्सूनचा आस मूळ स्थितीपासून दक्षिणेकडे सरकल्याने राज्याला फायदा होत आहे. बंगालच्या उपसागरामध्येही कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात आगामी काळामध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

उत्तर कोकण विभागात, उत्तर महाराष्ट्रात तसेच विदर्भामध्ये 9 सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर कायम राहील. तर मराठवाड्यात शुक्रवारी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रायगड, रत्नागिरी येथे सोमवार 11 सप्टेंबरपर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्गात रविवारनंतर मध्यम स्वरुपाचा पाऊस असेल असा अंदाज आहे.