डिलाईल रोड पूल की ‘डिले’ पूल! खडी घोटाळय़ामुळेच पूल रखडला, आदित्य ठाकरे यांचा सणसणीत टोला 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोअर परळच्या डिलाइल रोड पुलाचे काम सरकारच्या नाकर्तेपणामुळे आधीच रखडले असताना आता बहुतांशी काम झाले असतानाही पूल खुला करण्यात येत नाही. त्यामुळे ‘डिलाईल’ रोड पूल आहे की ‘डिले’ पूल आहे, असा सणसणीत टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी आज लगावला. ‘मिंधे’ सरकारच्या आशीर्वादाने झालेल्या खडी घोटाळ्यामुळेही पूल रखडल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला.

लोअर परळ पुलाची पाहणी आज आदित्य ठाकरे यांनी केली. यावेळी पुलाच्या संपूर्ण कामाचा आढावाही त्यांनी प्रशासनाकडून घेतला. यावेळी आमदार सुनील शिंदे, माजी महापौर स्नेहल आंबेकर उपस्थित होते. वरळी, डिलाईल रोड, करी रोड आणि लोअर परळला जोडणारा लोअर परळचा उड्डाणपूल आयआयटी, मुंबईने धोकादायक असल्याचा अहवाल दिल्यानंतर 2018 मध्ये तोडण्यात आला आहे. दोन ते तीन वर्षांत हा पूल पूर्णपणे बांधून तयार होणे अपेक्षित होते. मात्र कोरोनामुळे दोन वर्षे तसेच पश्चिम रेल्वेकडून विविध परवानग्या मिळण्यासाठी झालेल्या विलंबामुळे हा पूल तब्बल पाच वर्षे रखडला आहे. लोअर परळचा उड्डाणपूल हा मुंबई महापालिका आणि पश्चिम रेल्वेकडून उभारण्यात येत आहे. पश्चिम रेल्वेने दोन महाकाय गर्डर बसवण्यासह इतर कामे डिसेंबर 2022 पर्यंत पूर्ण केली. त्यानंतर मुंबई महापालिकेने काम हाती घेतले असून मे महिन्यांत लोअर परळ ते वरळीच्या दिशेने जाणारी मार्गिका वाहनांसाठी सुरू करण्यात आली आहे. या पुलासाठी आदित्य ठाकरे यांनी तत्कालीन रेल्वेमंत्री आणि मुंबई महापालिकेकडे वारंवार पाठपुरावा केला आहे.

48 तासांत पूल सुरू करा

पाच सहा महिन्यापूर्वी हा पूल महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला. मार्च-एप्रिलमध्ये खडी घोटाळा झाला नसता तर पुलाच्या दोन्ही बाजू आता सुरू झाल्या असत्या, असेही यावेळी ते म्हणाले. पुढच्या 48 तासांत या पुलाचे काम पूर्ण झाले पाहिजे, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. आम्ही याच पुलावरून गणपती आणणार, असाही इशारा त्यांनी यावेळी दिला.