साहित्यजगत- गणेश पूजन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> रविप्रकाश कुलकर्णी

कुठल्याही शुभकार्याची सुरुवात आपण ‘श्री गणेशाय नम’ म्हणत करतो. पूर्वापार ही प्रथा चालत आलेली आहे आणि पुढेही चालत राहील. याचे कारण केवळ पूर्वसुरींचे संस्कार हे नसून या बीजमंत्राने फलश्रुतीचा रोकडा साक्षात्कार लाभतो किंवा त्याचे आश्वासन तरी लाभते असा अनेकांचा अनुभव आहे. मात्र भाद्रपदातील चतुर्थीला जे गणेश स्मरण होते ते काही आगळेवेगळेच!

‘श्री गणेशाय नम’ असे स्तवन केल्यानंतर शेवटी आरती. त्याची सुरुवात होते ती ‘सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची…’ या समर्थ रामदासरचित आरतीने. समर्थांनी तीन-चार गणेशाच्या आरत्या केलेल्या आहेत, पण ‘सुखकर्ता दु:खहर्ता…’ भक्तजनांच्या मनात इतकी ठसली आहे की, ज्याचे नाव ते!

समर्थ रामदासकृत ‘सुखकर्ता दु:खहर्ता’ आरती सगळीकडेच आरंभी म्हणायची प्रथा कशी काय रूढ झाली असेल याचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतला पाहिजे. गणेशोत्सव म्हटला की, अजूनही मनाला पंख फुटतात. घरातली मुले त्यांच्या त्यांच्या पद्धतीने उत्साहाने काहीबाही कामे करत राहतात. यासाठी ही मंडळी कॉम्प्युटर, व्हॉट्सअ‍ॅप वगैरेची मदत घेतात हे पाहून गंमत वाटते. तेव्हा आठवली ती वसंत बापटांची कविता,

त्रिलोक्य व्यापूनही, कोठे न राहणारा
माझा गणेश नाही, मखरात मावणारा
नक्षत्र मंडलाची, माथ्यावरी झळाळी
आरक्तसूर्य भाळी, सिंदूर लावणारा
मूर्ती अमूर्त याची, रेखाल काय चित्री
विज्ञानरूपसूत्री, भूगोल ओवणारा
स्वार्थी, लबाड, लोभी, रोगी अपत्य कामी
येता पवित्र नाही, हाकून लावणारा
भक्तासं ना कळे हा, पोथीतूनी पळे हा
संशोधका मिळे हा, सत्यास पावणारा
आहे प्रकाश रूपे, विश्वात कोंदलेला
रेणूत कोंडलेला, बुद्धीस भावणारा
ज्याचा त्याचा गणेश वेगवेगळा मनात भरतो तो असा…

चित्रपटाच्या दुनियेत ग. दि. माडगूळकर अखंड बुडालेले असल्यामुळे त्यांचा घरात पाय ठरत नसे. मात्र गणेश चतुर्थी म्हटले की, सर्व कामधाम सोडून ते पुण्याला ‘पंचवटी’स म्हणजे त्यांच्या निवासस्थानी दाखल होत. मग साग्रसंगीत पूजाअर्चा होई. ती होईपर्यंत अण्णांचे चाहते, दोस्त, यार मंडळी दाखल होत. कारण या एकाच दिवशी अण्णा भेटणार याची खात्री असे. पूजा आटोपताच ‘सुदर्शन’ मासिकाचे संपादक द. का. हसबनीस अण्णांना ‘सुदर्शन’च्या ऑफिसात घेऊन येत. पूजेची जय्यत तयारी झालेली असे. त्याच्या सोबतच नवेकोरे पॅड, त्याला लावलेले स्वच्छ सनलेट बॉण्डचे पेपर आणि नवेकोरे पेन असे.

प्रसन्न मनाने ते हातात घेऊन अण्णा आधी कागदावर श्रीकार टाकत आणि त्या क्षणाला त्यांच्या डोक्यात कविता असेल, लेख असेल, तो झरझर कागदावर उमटे. इतर सगळी मंडळी अण्णांकडे कुतूहलाने पाहत की, आपण एका निर्मिती सोहळय़ाचे साक्षीदार आहोत. मग अण्णा पेनाचे टोपण लावून पॅडचे कागद हसबनीसांच्या हातात देत. लगोलग मॅटर कंपोज होऊन त्याची प्रत अण्णांच्या हातात येई. नजर टाकून अण्णा म्हणत,“छान!” मग संपादक हसबनीस जाहीर करत दिवाळी अंकाचा मुहूर्त झाला. असे हे गणेश पूजन आगळेवेगळेच.

‘आवाज’ दिवाळी अंकाचे संपादक मधुकर पाटकर गणपतीची पूजा करताना दिवाळी अंकाचे जे साहित्य आलेले असेल ते गणपतीपुढे ठेवत. ‘आवाज’ दिवाळी अंकाचा मुहूर्त हा असा. हीच परंपरा आता त्यांचे चिरंजीव भरत पाटकर सांभाळत आहेत. एकूण काय, दिवाळी अंकांची तयारी सुरू झाली आहे. तसे वारे वाहायला लागलेले आहेत. ‘श्री गणेशाय नम’ म्हणून लेखक, संपादक मंडळी कामाला लागलेली आहेत.