माझा बाप्पा माझा मूषक… कट्टा हायस्कूलच्या विद्यार्थ्यानी बनविले पर्यावरण पूरक मूषक!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोकणात गणेशोत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. गणेशोत्सवाचे औचित्य साधून मालवण तालुक्यातील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा येथे कलाविषयक समितीच्या माध्यमातून एका नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. गणपती बाप्पाचे वाहन म्हणजे मूषक अर्थात उंदीर. कोकणातील मूर्तिकार माती पासूनसुंदर गणेशमूर्ती बनवतात. मुलांनाही प्रत्यक्ष मातीकामाचा अनुभव मिळावा व त्यांनी बनवलेली कलाकृती गणपतीच्या आरासाचा एक भाग असावी, यासाठी विद्यार्थ्यांकडून मातीपासून पर्यावरणपूरक मूषक बनवण्याची कार्यशाळा नुकतीच या प्रशालेत घेण्यात आली.

ही कार्यशाळा घेत असताना, केवळ मूषकच नव्हे तर मूषकाच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला. एका हातात मोदक आणि दुसऱ्या हातात सामाजिक संदेश असलेले अबदागीर घेतलेले खूप सुंदर मूषक विद्यार्थ्यांनी बनवले. या उपक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण वाचवा, झाडे लावा झाडे जगवा,रक्तदान श्रेष्ठदान मोबाईलचा अति वापर टाळा असे विविध सामाजिक संदेश देण्यात आले. या कार्यशाळेचे उद्घाटन न्यू इंग्लिश स्कूल पेंडुरचे माजी कलाशिक्षक सुधाकर कदम, गोळवण गावचे माजी सरपंच आबा परब, वराडकर हायस्कूल कट्टाचे मुख्याध्यापक संजय नाईक यांनी केले. या विद्यार्थ्याना कलाशिक्षक समीर चांदरकर यांनी मार्गदर्शन केले, यावेळी मूषक बनवण्याच्या कार्यशाळेसोबतच विद्यार्थ्यांची स्पर्धाहि घेण्यात आली. या स्पर्धेचे परीक्षण सुकळवाड येथील प्रसिद्ध मूर्तिकार अरुण पालकर व पेंडूर येथील मूर्तिकार अनिल सावंत यांनी केले. यशस्वी विद्यार्थ्यांना आकर्षक सन्मान चिन्ह व सर्व सहभागी विद्यार्थ्यांना शामदीप प्रिंटर्स कट्टा यांच्यामार्फत सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टाचे सचिव सुनील नाईक, तसेच सचिव विजयश्री देसाई व सर्व सहकारी शिक्षक यांनी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांसोबतच मूषक बनवण्याचा अनुभव घेतला. कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजय राज वराडकर व सर्व संचालक मंडळ यांनी या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले.