नागपूरमध्ये तुफानी पावसाचं थैमान, शहरात पाणी साचल्याने पूरपरिस्थिती ओढवली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शुक्रवारी मध्यरात्रीपासून नागपुरात तुफान पावसाने थैमान घातलं आहे. विजांच्या कडकडाटासह कोसळलेल्या मुसळधार पावसाने नागपूर शहरात हाहाकार माजला आहे. अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरलं असून रस्ते पाण्याखाली बुडाले आहेत. शहरातील वीज यंत्रणेलाही या पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळे शुक्रवारी रात्रीपासून शहरातील अनेक भागातील वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे.

हिंगणा आणि एमआयडीसी परिसरात पाणी शिरल्यामुळे तेथील पाणी अंबाझरी तलावात आलं आहे. त्यात पावसाची भर पडल्यामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो होऊन परिसरातील लोकांच्या घरात पाणी शिरले आहे. नागपूर येथील रेल्वे रुळांवरही पाणी साचल्याने अनेक रेल्वेगाड्या रद्द झाल्या असून काही उशिराने धावत आहेत.

महापालिकेची यंत्रणा घटनास्थळी पोहोचली असून लोकांना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सुरू झालं आहे. शहरातील कॉर्पोरेशन कॉलनी ,कस्तुरबा नगर, डागा ले आऊट, सुभाष नगर या परिसरांत राहणाऱ्या पाचशे नागरिकांना आतापर्यंत बाहेर काढण्यात आलं आहे. तीन बोटी घटनास्थळी आल्या असून बोटीच्या सहाय्याने लोकांना घराच्या बाहेर काढले जात आहे. या बचावकार्याचा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत पावसाचं पाणी रस्त्यावरून वाहताना दिसत असून त्यातून बचावकार्य करण्यात येत असल्याचं दिसून येत आहे.

नागपूरच्या मध्यवर्ती भागात असलेल्या सीताबर्डी पंचशील चौक धंतोली येथे रस्त्यांवर तीन ते चार फूट पाणी साचलं आहे. अनेक शाळांमध्ये देखील पाणी भरले असून जिल्हा प्रशासनाने शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. पंचशील चौक परिसरात मोठ्या प्रमाणावर रुग्णालये आहेत. त्यापैकी काही रुग्णालयांच्या आत देखील पाणी शिरले आहे. त्यामुळे रुग्णांची देखील गैरसोय होताना दिसत आहे.