प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या कार्यक्रमाला मंत्री विखेंसह अनेकांची दांडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भारतीय जनता पार्टीने नगर शहरामध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असताना आजच्या या सकाळी झालेल्या रॅलीच्या कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी दांडी मारल्यामुळे तो विषय चांगलाच चर्चेचा होता.

नगर शहरामध्ये घर चलो अभियानांतर्गत रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये भाजपचे खासदार सुजय विखे, आमदार राम शिंदे, जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, माजी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे ,शहराध्यक्ष अभय आगरकर यांच्यासह आजी माजी नगरसेवक पदाधिकारी यामध्ये सहभागी झाले होते.

वास्तविक पाहता गेल्या आठवड्याभरापासून भाजपने या कार्यक्रमासाठी तयारी सुरू केलेली होती. नगर जिल्ह्यामध्ये धडाकेबाज कार्यक्रम करायचा असा घाट घातला होता, तब्बल सात कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षाने हा कार्यक्रम आयोजित केलेला होता. या जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे महसूल मंत्री विखे यांनी या रॅलीलाच अनुपस्थिती लावली व तोच विषय चर्चेचा ठरला.

विशेष म्हणजे गेल्या पंधरा दिवसापासून नगर जिल्ह्यामध्ये धनगरांचा आरक्षण हे मोठ्या प्रमाणामध्ये पेटले आहे, त्यातच काही दिवसांपूर्वी विखे यांनी या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला पण ऐनवेळेला दौरा रद्द केल्यामुळे चांगलाच वादंग पेटलं होता. या ठिकाणी मंत्री गिरीश महाजन यांनी येऊन शिष्टाई केली मात्र त्यालाही काही उपयोग झाला नाही .बहुदा यासह विविध कारणांमुळे ते उपस्थित राहिले नाही अशी चर्चा सुरू झाली आहे, वास्तविक पाहता राधाकृष्ण विखे हे काल नगरला भाजपाच्या एका कार्यक्रमाला उपस्थित राहतात मात्र आज आले नाही याची सुद्धा चर्चा या ठिकाणी रंगली होती. त्याचबरोबर भाजपाचे आमदार मोनिका राजळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे हे सुद्धा या ठिकाणी दिसून आले नाही भाजपाच्या गोटात हा चर्चेचा विषय होता. तर दुसरीकडे मंत्री विखे हे ज्या वेळेला नगर जिल्ह्यामध्ये येतात त्या वेळेला दौरा हा सर्व ठिकाणी कळवण्यात येतो मात्र गेल्या तीन दिवसापासून त्यांच्या दौराच दिला जात नसल्यामुळे सुद्धा उलट सुद्धा चर्चा सुरू आहे.