
महाराष्ट्राची कुलस्वामिनी व राहुरीची माहेरवाशीण असलेल्या श्री तुळजाभवानीमातेच्या पालखीचे आज सायंकाळी वाजतगाजत व भंडाऱ्याची उधळण करीत भक्तिमय वातावरणात राहुरीतून तुळजापूरला प्रस्थान झाले.
आज सकाळी 11 वाजता माजी मंत्री शिवाजी कर्डिले व विकास मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब तनपुरे यांच्या हस्ते पालखीचे विधिवत पूजन करण्यात आले. दुपारी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांनी सपत्नीक आरती केल्यानंतर वाजतगाजत व भंडाऱ्याची उधळण करीत मानकऱ्यांच्या घरासमोर पालखी नेण्यात आली. यावेळी हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या तरुणांनी पालखी खांद्यावर घेऊन ‘आई भवानीचा उदो उदो’ या घोषणा देत पालखीला खेळविले.
यावेळी शहरातील प्रत्येक मानकऱयांच्या घरासमोर पालखी नेऊन साडी-चोळीने ओटी भरण्यात आली. छबिन्यापूर्वी तुळजापूर येथून पालखीचा दांडा राहुरीत आल्यानंतर शहरातील सुतार समाजाच्या वतीने पालखीचा साठा बनविण्यात आला, तर लोहार समाजाच्या वतीने पालखीसाठी लागणारे लोखंड देण्यात आले. अशा प्रकारे सर्व मानकरी घरांच्या वतीने पालखीसाठी लागणारे साहित्य देऊन पूर्ण पालखी सजविण्यात आली होती. पुष्पहारांनी सजविलेल्या ट्रॉलीमध्ये पालखी ठेवून शहरातील विविध भागांत फिरविण्यात आली. सायंकाळी देसवंडीमार्गे तुळजापूरकडे पालखीचे प्रस्थान झाले.
पालखी प्रस्थानावेळी सुरेश बाणकर, बाळकृष्ण बाणकर, अण्णासाहेब शेटे, ऍड़ राहुलभैया शेटे, माजी नगराध्यक्ष अनिल कासार, माजी उपनगराध्यक्ष सूर्यकांत
भुजाडी, उमेश शेळके, गणेश खैरे, सचिन मेहेत्रे, सुजय काळेंसह भाविक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.





























































