बॉक्साईट उत्खननास मांदिवलीवासीयांचा तीव्र विरोध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शासनस्तरावरून मांदिवली येथे बॉक्साईट उत्खनन सुरू करण्याचा घाट घातला जात आहे. त्याबाबतच्या हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. गावाचे गावपण हरविणाऱ्या मांदिवली येथील प्रस्तावित बॉक्साईट उत्खननास येथील ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. दापोली तालुक्यातील मांदिवली गावाच्या महसुली हद्दीत 139.05 क्षेत्र हे बॉक्साईट खनिज उत्खनन करण्यासाठी म्हणून शासनाकडून खनिज पट्टा मंजूर करण्यात आला आहे. या मंजूर खनिज पट्ट्यातील महसुली क्षेत्रात मे हनिफा हरूण फजलानी यांचेकडून बॉक्साइट खनिज उत्खन केले जाणार आहे. उत्खनन करण्यासाठीची क्षमता वार्षिक 0.26 दशलक्ष टन त्याचप्रमाणे 200 टन प्रतिताशी खनीज माल फोडण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे प्राप्त झाला आहे. त्यानुसार प्रदुषण मंडळाकडून याबाबतची जाहीर जनसुनावणी 18 ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे. ही जनसुनावणी रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा खनिकर्म अधिकारी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आदी अधिकाऱ्यांच्या उपस्थित मांदिवली येथे घेण्यात येणार आहे.

वास्तविक पाहता मांदिवली गावाची एकुणच सरंचना पाहता या गावाचे वैभव हे बॉक्साइट खनिजाच्या उत्खननामुळे खरे तर लोप पावणार आहे. मांदिवली गावाच्या हदृदीला लागूनच असलेल्या उंबरशेत, रोवले येथील खनिज उत्खननामुळे तेथील लोकांना उत्खननाचे भोगावे लागत असलेले दुष्परिणाम हे सर्वांच्या डोळयासमोर आहेत. यामध्ये पाण्याची पातळी खोलवर जाणे अथवा पाण्याच्या स्त्रौताच्या प्रवाहाची दिशा बदलल्याने पाणी समस्येसारखी गंभीर समस्या निर्माण होणे, गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणे, वन्य प्राण्यांचा अधिवासाचा प्रश्न निर्माण होणे, लोकांच्या उदर निर्वाहनाचे साधन असलेल्या आंबा, काजू फळ लागवडीसह भात नागली पिकावर धुळीच्या साम्राज्यामुळे पिकावर होणारे परिणाम आणि त्यामुळे घटलेले उत्पन्न पाहता मांदिवली येथील रहिवाशांमध्ये एकप्रकरची भिती निर्माण झाली आहे. उत्खनन करणारे हे आपल्या कामापुरते गोड बोलून जातात अशिक्षित लोकांना भुरळ पाडतात आणि काम होईपर्यंत काहीतरी लाभाचे आमिश दाखवतात मात्र आपले काम झाले की पाठ फिरवतात असाच प्रकार रोवले आणि उंबरशेतमध्ये झाला आहे. उत्खनन केलेले महाकाय खोलीचे खड्डे तसेच ठेवले गेले आहेत. की जे धोक्याचे आहेत. झाडांची लागवड केली जाईल असे सांगण्यात आले होते मात्र अदयापही लागवड झाल्याचे दिसत नाही. अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे निर्माण होणा-या धुळीवर पाणी मारणार असे सांगितले जाते मात्र ती प्रक्रिया केवळ सरकारी अधिकारी येतात तेव्हाच केली जाते अन्यवेळी पाणी मारले जात नाही ही सरकारी अधिका-यांच्या डोळ्यातील धूळ फेक त्यांना दिसत नाही. बिगर पासिंग अवजड वाहने भरधाव वेगाने हाकली जातात की ज्यामुळे अनेकदा अपघाताचे प्रसंग घडले आहेत. त्यामुळे रहीवाशांना धोक्याचा वाटणारा बॉक्साइट खनिज उत्खननासारखा हा धोक्याचा प्रकल्प मांदिवलीत होता कामा नये असे येथील ग्रामस्थांची ठाम भुमिका असून या विरोधात मांदिवली ग्रामस्थ एकवटले आहेत. त्याला मांदिवली 11 गाव कुणबी सेवा संघाने जाहीर पाठींबा दिला आहे. त्यामुळे सहजासहजी हा प्रकल्प कुणालाही रेटता येणार नाही.

बॉक्साइट उत्खनाने जर मांदिवली येथील नैसर्गिक साधन समृध्दीला धोका येणार असेल आणि बॉक्साइट उत्खनाचे दुष्परिणाम गावाला वर्षोनुवर्ष भोगावे लागणार असतील तर या उत्खननाला आमचा विरोधच राहील.