निकृष्ट नळपाणी योजनेतील दोषींवर कारवाई न झाल्यास मुख्य सचिव आणि लोकायुक्तांकडे दाद मागणार – सुदेश मयेकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत रत्नागिरी शहरात राबवण्यात आलेल्या सुधारीत नळपाणी योजनेचे काम अतिशय निकृष्ट झाले आहे. 6 वर्षे होऊनही अद्याप ही नळपाणी योजना पूर्ण झालेली नाही. या निकृष्ट कामाची चौकशी करून ठेकेदारावर कारवाई व्हावी जर जिल्हा प्रशासनाकडून ठेकेदारावर कारवाई झाली नाही तर महाविकास आघाडीचे आमदार भास्कर जाधव यांच्या माध्यमातून विधानसभेत लक्ष्यवेधी मांडू. त्याशिवाय मुख्य सचिव आणि लोकायुक्त यांच्याकडे तक्रार करू अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर यांनी पत्रकार परिषदेत मांडताना नळपाणी योजनेची ठेकेदार कंपनी अन्वी कन्स्ट्रक्शनची नगरपालिका प्रशासन भांडी घासत आहे असा आरोप केला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, गणेशोत्सवात शीळ धरणातील जॅकवेल कोसळल्यामुळे रत्नागिरी शहरावर पाणी पाणी करण्याची वेळ आली होती. पण मी १६ जानेवारी 2013 रोजी जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिले होते. त्याच निवेदनात अन्वी कन्स्ट्रक्शनच्या कामातील गंभीर त्रुटी मांडल्या होत्या. मंजूर अंदाजपत्रकाद्वारे नळपाणी योजनेची पाईपलाईन साडेचार फूट जमिनीच्या खालून घालणे स्पष्ट नमूद केले असताना ठेकेदाराने दोन फूटांवरच पाइपलाईन घातल्या आहेत. पुरवण्यात आलेल्या पाईपच्या दर्जाबाबतही प्रश्न उपस्थित होत आहे. शीळ येथून येणाच्या पाण्याचा दाब थोड्या प्रमाणात वाढला तरी पाईपलाईन ठिकठिकाणी फुटत आहेत आणि लाखो लिटर पाणी वाया जात आहे. या योजनेचे काम दिलेल्या मुदतीत पूर्ण करून एकवर्षीय योजना ठेकेदाराने सांभाळायची होती आणि नंतरच नगरपरिषदेकडे हस्तांतरीत करणे बंधनकारक होते. असे असताना ज्याठिकाणी पाईपलाईन फुटत आहेत त्या ठिकाणी नगरपरिषदेकडून दुरुस्त केल्या जात आहेत. त्यासाठी झालेला खर्चसुध्दा संबंधित मक्तेदाराकडून वसूल केला जात नसल्याची गंभीर बाब सुदेश मयेकर यांनी मांडली. योजनेतील पाईपलाईन टाकताना भविष्यात होणाऱ्या रस्त्याचा विचार न करता रस्त्याच्या मधोमध पाईपलाईन घालण्यात आली आहे. पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्यास रस्ते खोदावे लागणार आहेत. या सर्व तक्रारी मांडल्यानंतरही जिल्हाधिकाऱ्यांकडून कोणतीही कारवाई न झाल्यामुळे २८ फेब्रुवारीला पुन्हा एक पत्र दिले होते. त्यानंतर आज पुन्हा एक पत्र प्रशासनाला दिले असल्याचे सुदेश मयेकर यांनी सांगितले. प्रशासनाकडून आताही कारवाई न झाल्यास मुख्य सचिव आणि लोकायुक्त यांच्याकडे तक्रार करणार. तसेच महाविकास आघाडीचे आमदार भास्कर जाधव यांच्यामार्फत विधानभवनात लक्ष्यवेधी मांडणार असल्याचे मयेकर यांनी सांगितले.

पालकमंत्र्यांनीच ठेकेदाराकडून काम करून घ्यायला हवे होते
रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी ठेकेदारावर दबाव टाकून कामे योग्य वेळेत पूर्ण करून घ्यायला हवी होती. अजूनही ते ठेकेदाराकडून कामे पूर्ण करून घेऊ शकतात. कारण त्यांना यातील सर्व एबीसीडी माहिती आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर यांनी सांगितले.

नगरपरिषद प्रशासन आणि तत्कालीन नगराध्यक्ष राहूल पंडीत जबाबदार
आज रत्नागिरी शहरात जो नळपाणी योजनेचा गोंधळ उडाला आहे. जे निकृष्ट आणि रखडलेले काम आहे त्याला नगरपरिषद आणि तत्कालीन नगराध्यक्ष शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राहत पंडीत जबाबदार आहेत. कारण त्यांच्या काळात निविदा निघाली. त्यांच्या काळात काम सुरू झाले असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर यांनी केला.