मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाला पूर्णवेळ संचालक नसल्यामुळे विद्यापीठाच्या प्रत्येक परीक्षा आणि निकालात गोंधळ सुरू आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकाच हरविल्याची शंका उपस्थित होत आहे. उत्तरपत्रिका गहाळ झाल्याने मुख्य परीक्षा आणि पुनर्मूल्यांकनाचे निकाल विद्यापीठाने जाहीर केलेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्याची नामुष्की विद्यापीठावर ओढवली आहे.
मुंबई विद्यापीठात सुरू असलेल्या या निकाल गोंधळाची शिवसेना, युवासेनेने गंभीर दखल घेतली आहे. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडे विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारींनुसार माजी युवासेना सिनेट सदस्यांनी राज्यपाल, कुलपती रमेश बैस यांना ई-मेलद्वारे निवेदन दिले आहे. तसेच मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षांच्या निकाल आणि पुनर्मूल्यांकनमधील गोंधळावर चर्चा करून तोडगा काढण्यासाठी लवकरच राज्यपालांची युवासेना माजी सिनेट सदस्य भेट घेणार आहेत, असे माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर यांनी सांगितले.
मुंबई विद्यापीठाद्वारे उन्हाळी सत्रात घेण्यात आलेल्या काही परीक्षांचे आणि पूनर्मूल्यांकनाचे निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत.
अनेक विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेची नक्कल प्रतीची मागणी करून एक महिन्यापेक्षा जास्त अवधीनंतरही ती मिळालेली नाही.
विद्यार्थी उपकुलसचिव संतोष सोनावणे यांच्या कक्षाबाहेर तासन्तास ताटकळत उभे असतात, मात्र त्यांना निकालाविषयी कोणतीही माहिती मिळत नाही.
यामुळे निकाल राखीव?
मुंबई विद्यापीठ सर्व परीक्षांच्या उत्तरपत्रिका मेरिट्रक या आस्थापनाद्वारे तपासणी केली जात असे; परंतु त्यांनी सदर कामासाठी अधिक पैशाची मागणी केल्याने स्पलाशगैन आणि मॅग्नेटीक या आस्थापनांना काम देण्यात आले. त्यामध्येही स्पलाशगैन अपात्र ठरले आणि पुढील काम फक्त मॅग्नेटीकला देण्यात आले. आता उन्हाळी सत्र परीक्षांच्या उत्तरपत्रिका तीनही आस्थापनांकडे असल्यामुळे त्या गहाळ झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी, अनेक विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवल्याचा आरोप युवासेनेने केला आहे.




























































