
काळाचौकी येथील अभ्युदयनगर म्हाडा वसाहतीतील इमारती जुन्या झाल्या असून त्यामुळे रहिवाशांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या वसाहतीचा लवकरात लवकर पुनर्विकास केला जावा, अशी मागणी शिवसेनेचे विधिमंडळ गटनेते अजय चौधरी यांनी सातत्याने करून त्यासाठी म्हाडा अधिकारी आणि गृहनिर्माण मंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला होता. नुकत्याच गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत अभ्युदयनगरच्या पुनर्विकासाचा निर्णय महिनाभरात घेतला जाईल, असे आश्वासन गृहनिर्माण मंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे अभ्युदयनगरमध्ये जीव मुठीत घेऊन राहणाऱ्या शेकडो कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबईत म्हाडाच्या अनेक वसाहती असून त्यातील इमारती या जुन्या झाल्यामुळे दुरुस्तीच्या पलीकडे गेल्या आहेत. वरवरची दुरुस्ती करण्यापेक्षा वसाहतींचा पुनर्विकास करून हजारो कुटुंबांना दिलासा द्यावा, अशी मागणी रहिवासी गेली अनेक वर्षे करत आहेत. यात काळाचौकीमधील अभ्युदयनगरमधील वसाहतीचा समावेश असून या वसाहतींचा पुनर्विकास व्हावा, यासाठी शिवसेनेने सातत्याने पाठपुरावा केला आहे.
नुकत्याच गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांच्या दालनात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत विधिमंडळ गटनेते अजय चौधरी, माजी आमदार बाळा नांदगावकर, म्हाडाचे उपाध्यक्ष आणि सीईओ संजीव जैसवाल, म्हाडाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरिकर आदी उपस्थित होते. यावेळी अभ्युदयनगरमधील म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासाच्या प्रश्नावर सकारात्मक चर्चा झाली. येत्या एका महिन्यात कॅबिनेटच्या बैठकीत योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन गृहनिर्माणमंत्र्यांनी दिले.


























































