
शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पाठपुराव्यामुळे म्हाडा इमारतींच्या पुनर्विकासाला गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी कमी ‘एफएसआय’मुळे पुनर्विकासासाठी विकासक पुढाकार घेत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हजारो रहिवाशांना म्हाडाच्या जुन्या गळक्या धोकादायक घरांमध्ये जीव मुठीत धरून रहावे लागत आहे. त्यामुळे ‘म्हाडा’ इमारतींच्या पुनर्विकासाला चालना देण्यासाठी सरकारने विकासकांना सवलती द्याव्यात, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. यासाठी आमदार अजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली शिवडी विधानसभा क्षेत्रात रहिवाशांच्या सह्यांची मोहीम राबवण्यात येत आहे.
मुंबईत म्हाडाच्या 388 इमारतींमध्ये 38 हजार कुटुंब राहतात. या इमारतीत 160/180/215 चौरस फुटाच्या सदनिका असून इमारतींची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. शिवसेना आमदार अजय चौधरी यांच्या सातत्याच्या प्रयत्नामुळे या इमारतींच्या पुनर्विकासाचे धोरण सरकारने किकास नियंत्रण नियमाकली 33 (24) नुसार जाहीर केले आहे, परंतु या धोरणानुसार देण्यात आलेला प्रोत्साहनपर एफएसआय कमी असल्याने कोणीही विकासक पुनर्विकासासाठी पुढे येत नाही. त्यामुळे या 33 (24) धोरणामध्ये किकास नियंत्रण नियमावली 33 (7) प्रमाणे सवलती द्या, अशी मागणी आमदार अजय चौधरी सातत्याने करीत आहेत.
सरकारचे आश्वासन हवेतच
शिवसेनेने याबाबत केलेल्या पाठपुराव्यानंतर विधानसभेत सरकारकडून आश्वासन देण्यात आले, मात्र आजपर्यंत यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून या प्रस्तावाकडे गांभीर्याने लक्ष देऊन ती मागणी मान्य कराकी आणि मूळ मुंबईकरांचे स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यास सहकार्य करावे, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे.
पुनर्विकास मार्गी लागावा यासाठी आमदार अजय चौधरी यांच्या संकल्पनेतून शिवडी विधानसभेतील म्हाडाच्या इमारतीमधील रहिवासी आपल्या सह्यांचे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना शाखा प्रभाग क्र. 206 मधील आशीर्वाद, शुभ आशीर्वाद, विठ्ठल विनायक सदन येथील रहिवाशांच्या घरोघरी जाऊन सही असलेल्या पत्राचे निवेदन घेण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक सचिन पडवळ, शाखाप्रमुख हनुमंत (बैजू) हिंदोळे आणि स्थानिक सोसायटी पदाधिकारी, स्थानिक रहिवासी उपस्थित होते.



























































