परळ स्थानकात रेस्टॉरंट ऑन व्हीलचा घमघमाट येणार, CSMT पुनर्विकासाच्या कामामुळे जागा बदलण्याचा रेल्वेचा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील ‘रेस्टॉरंट ऑन व्हील’ या आगळय़ावेगळय़ा हॉटेलमधील खाद्यपदार्थांचा घमघमाट आता परळ स्थानकात येणार आहे. सीएसएमटी स्थानकाच्या पुनर्विकासाचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे येथे असलेले रेस्टॉरंट ऑन व्हील, हेरिटेज गॅलरी परळ स्थानकाबाहेर असलेल्या रिकाम्या जागेत स्थलांतरित करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.

मध्य रेल्वेने सीएसएमटी स्थानकाच्या फलाट क्रमांक 18 च्या बाजूला रेल्वेच्या जुन्या डब्याचा वापर करून आणि खाली रेल्वे ट्रक टाकून ‘रेस्टॉरंट ऑन व्हील’ दोन वर्षांपूर्वी सुरू केले आहे. त्या माध्यमातून रेल्वेला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत असून ते प्रवाशांमध्येही लोकप्रिय ठरले आहे. मात्र पुनर्विकासाच्या कामामुळे सदरचे रेस्टॉरंट दादर किंवा लोकमान्य टिळक टर्मिनस येथे हलवण्याबाबत रेल्वेच्या हालचाली होत्या. मात्र दोन्ही स्थानकांऐवजी परळ स्थाकाबाहेर हे ‘रेस्टॉरंट ऑन व्हील’ थाटण्याचा निर्णय झाला आहे. दरम्यान, सीएसएमटीचे रेस्टॉरंट बंद करण्यात आले आहे. 10 टेबल असलेल्या या रेस्टॉरंटमध्ये एकावेळी 40 जणांना बसून जेवण करता येणार आहे.

अपुऱ्या जागेमुळे गर्दी होण्याची भीती

रेल्वने ‘रेस्टॉरंट ऑन व्हील’ नक्की कोणत्या जागी लावले नसले तरी परळ स्थाकाच्या पूर्वेला तिकीटघराच्या समोर असलेल्या रिकाम्या जागेत लावल्यास केईएम, वाडिया रुग्णालयाकडून मोठय़ा प्रमाणात प्रवासी परळ स्थानकात येतात. तसेच येथील प्रवासी संख्या दिवसोंदिवस वाढत असल्याने येथे गर्दी होऊन प्रभादेवीच्या रेल्वे पुलावर चार वर्षांपूर्वी झालेली चेंगराचेंगरीसारखी घटना घडण्याची भीती प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.