समांतर टेलिकॉम एक्सचेंजद्वारे खंडणी मागणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीतील तिघांना अटक; गुन्ह्यातील साहित्य जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सिमबॉक्स कार्यप्रणालीद्वारे समांतर टेलिकॉम एक्सचेंज चालवून खंडणी मागणार्‍या आंतरराष्ट्रीय टोळीतील तीन जणांना नांदेड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबतची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली आहे.

नांदेड जिल्ह्यातील कंधार येथील एका व्यापार्‍याला वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरुन मानसिक त्रास देत खंडणीची मागणी करण्यात येत होती. या प्रकरणी व्यापार्‍याने पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर हे प्रकरण गंभीर स्वरुपाचे असल्याने अप्पर पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज गुरव यांच्या अधिपत्याखाली विशेष पथके तयार करण्यात आली. या घटनेचा तपास केल्यानंतर वेगवेगळे मोबाईल क्रमांक सिमबॉक्सचा वापर करुन अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कॉल करण्यात येत असल्याचे निष्पन्न झाले.

या सिमबॉक्सचे लोकेशन कर्नाटक राज्यातील दांडेली येथे असल्याचे समजल्यानंतर नांदेड पोलिसांनी तीन वेगवेगळी पथके तयार केली. अत्यंत गोपनियरित्या ही कारवाई करत असताना पोलिसांनी आरोपी सियाबुद्दीन अब्दुल रहेमान, जयेश अशोक बेटकर (दोघे रा.दांडेली जि.कारवार,कर्नाटक), रशिद अब्दुल अजीज (रा.नोटटानविडन जि.मलपूरम,केरळ) या तिघांना अटक केली. या आरोपींकडून दहा सिमबॉक्स, एक हजार 244 सिमकार्ड, पाच राऊटर, पाच लॅपटॉप व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. हे आरोपी एअरटेल कंपनीच्या सिमकार्डचा वापर करुन सॉफ्टवेअरव्दारे जीएसएममध्ये रुपांतर करुन लोकांची फसवणूक करत होते. याद्वारे ते अनेकांची आर्थिक लूट करत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली. याबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्यानंतर या कारवाईला वेग आल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय टोळीला अटक करण्याची कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक अविनाशकुमार, खंडरोय धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज गुरव, मारोती थोरात, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, कंधारचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, लिंबगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार, कंधार पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर, आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक राजेश आलिवार, वजिराबाद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राम केंद्रे, पोलीस उपनिरीक्षक दशरथ आडे, दत्तात्रय काळे, गजानन दळवी यांच्या पथकाने केली.