
एवढ्या सकाळी बिर्याणी पार्सल मिळणार नाही तर दुपारी मिळेल, असे सांगणाऱ्या हॉटेल चालकाला तिघांनी मिळून कोयत्याने वार करून जखमी केल्याची घटना कोंढवा भागात घडली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी दोघांना तत्काळ अटक केली आहे. आयान शेख (वय 19), आली शेख (वय 18, दोघेही रा. कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. तर अर्श मुलानी (वय 20, रा. कोंढवा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अब्दुल रहीम मुश्ताक अली (रा 42, अश्रफ नगर, कोंढवा) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. सोमवारी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अब्दुल अली यांचे कोंढवा येथे ख्वाजा गरीब नवाज नावाचे हॉटेल आहे. सोमवारी (दि. 16) सकाळी 7.30 वाजता आरोपी आयान शेख, अली शेख आणि अर्ष मुलानी हे त्यांच्या हॉटेलमध्ये गेले आणि त्यांनी बिर्याणी पार्सल मागितली. यावेळी तक्रारदार म्हणाले की, एवढ्या सकाळी बिर्याणी मिळणार नाही दुपारी मिळेल, असे म्हणाल्यावर संतापलेल्या आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून कोयत्याने मारहाण केली. यात तक्रारदार जखमी झाले आहेत. मारहाणीनंतर आरोपींनी तक्रारदारांच्या मोटारसायकलचे नुकसान तसेच येथील सीसीटीव्ही फोडले. माहिती मिळताच कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत काही तासांच्या आत यातील दोघांना अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, अंमलदार अमोल हिरवे, अभिजित रत्नपारखी, राहुल रासगे, शशांक खाडे यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.

























































