आमदार अपात्रतेवर आज सुनावणी, कागदपत्र जमा करण्याची मुदत संपली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनेशी गद्दारी करून मिंधे गटात गेलेल्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात देण्यात आलेली कागदपत्र आपल्यापुढे सादर करा, अशा सूचना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिल्या होत्या. त्यासाठी दिलेली 25 ऑक्टोबरची मुदत बुधवारी सायंकाळी संपली. अध्यक्ष नार्वेकर यांच्यापुढे आमदार अपात्रतेबाबत दाखल याचिकांवर उद्या गुरुवारी सुनावणी होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्याकडे सोपवले आहे. याचिकांमधील विषय एकच असल्याने सर्व 34 याचिकांवर एकत्रित सुनावणी घेण्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून करण्यात आली होती. ही मागणी मान्य करत आमदार अपात्रतेबाबत दाखल याचिकांची सहा गटांत विभागणी करून एकत्र सुनावणी घेण्याची तयारी नार्वेकर यांनी मागील सुनावणीच्या वेळी दर्शविली आहे. त्यानुसार गुरुवार, 26 ऑक्टोबर रोजी विधानसभा अध्यक्षांपुढे सुनावणी होईल.

34 याचिकांची सहा गटांत विभागणी

सर्व 34 याचिकांची सहा गटांत विभागणी करून एकत्रित सुनावणी करण्यात येणार आहे. पहिल्या बैठकीस हजर राहिले नाहीत. दुसऱया बैठकीस उपस्थित नव्हते. विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत व्हीप मोडला. बहुमत चाचणीच्या वेळी व्हीपविरोधात मतदान. मिंधे गटाने बजावलेला व्हीप मोडला आणि अपक्ष आमदार गट अशी वर्गवारी केली आहे.