
>> चंद्रसेन टिळेकर
देव आणि देवत्वाचा भाबडेपणा आपल्या समाजात इतका रुतून बसला आहे की त्यामुळे यासंदर्भात केलेली कोणतीही चर्चा, चिकित्सा भाविक, धार्मिक माणसांना चालत नाही. मात्र यामुळेच सण, उत्सव, धर्म याबाबत अविवेकी, असंस्कृत आक्रमण होत आहे.
देव आणि धर्म ही एकूणच या पृथ्वीतलावरील मानवजातीची श्रद्धास्थाने आहेत. त्यामुळे यासंदर्भात जराही चर्चा, चिकित्सा केलेली सामान्य माणसाला, विशेषत भाविक, धार्मिक माणसांना चालत नाही. असे असले तरी असे बंधन कलावंतांवर, त्यांच्या कलाकृतींवर आपल्याला घालता येत नाही. कारण तो एक प्रकारे त्यांच्या आविष्कार स्वातंत्र्यावर केलेला घाला असतो. दुसरे म्हणजे वैचारिकदृष्टय़ा मुक्त असलेल्या समाजाची प्रगती जितक्या गतीने होते, तितकी प्रगती वैचारिकदृष्टय़ा कर्मठ म्हणजेच ढिम्म असलेल्या समाजाची होत नाही हे कुणालाही मान्यच व्हावे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे पाचशे-सहाशे वर्षांपूर्वी युरोपात अवतरलेल्या प्रबोधन युगाचे देता येईल की, ज्या प्रबोधन युगाला युरोपियन रेनेसाँस या नावाने ओळखले जाते. ही जी वैचारिक लाट युरोपात उसळली त्यामुळे संपूर्ण युरोप ज्ञानकिरणांनी उजळून गेला आणि सर्व जग त्यातल्या छोटय़ा छोटय़ा देशांनी पादांत केले. हे वैचारिक अभिसरण त्यांच्या जीवनातील सर्व क्षेत्रांत झाले, अगदी धार्मिक क्षेत्रही त्यातून सुटले नाही. इतके की, त्या जगताचे धार्मिक गुरू असलेल्या पोप यांच्याही अधिकाराविषयीच नाही, तर त्यांचे वेळोवेळी निघणारे धार्मिक फतवेही वैचारिक कसोटीवर घासूनच स्वीकारले जाऊ लागले.
दुर्दैवाने अशा प्रकारची वैचारिक ाढांती आपल्या देशात होऊ शकली नाही. कारण एकतर आपण कोणत्या ना कोणत्या परकीय आाढमकांचे गुलाम होतो आणि दुसरे म्हणजे त्याच कालखंडात आपल्याकडे, विशेषत महाराष्ट्रात संतांचे साम्राज्यच उदयाला आले होते. यातून फार मोठी धार्मिकता, भक्तिभाव समाजात रुजला. परिणामी कसलीही धार्मिक चिकित्सा करण्याचे आपण टाळण्याचाच प्रयत्न केला. अर्थात याला अपवाद राजा राममोहन रॉय, बसवेश्वर, म.ज्योतिबा फुले, आगरकर यांच्यासारखे समाजसुधारक नक्कीच होते. तरी देव आणि देवत्वाचा भाबडेपणा आपल्या समाजात इतका रुतून बसला की, देवाचारात अनेकदा अनिष्ट घटना घडताना पाहूनही विचारी माणसे लांबच राहिली. याचा परिणाम असा झाला की, इथले बरेचसे देव आणि धर्म काहीशा असंस्कृत अशा लोकांच्या हातात गेला.त्या लोकांनी आपापल्या वैचारिक मगदुराप्रमाणे देवाचे स्वरूप कल्पिले. वैचारिक उडी तोकडी असली म्हणजे कशा तोकडय़ा कल्पना केल्या जातात याचे इतिहासातले उत्तम उदाहरण म्हणजे शिवरायांच्या भवानी तलवारीचे ! खरं तर त्या वेळी युद्धात तोफ वापरली जाऊ लागली होती तेव्हा भवानी मातेने दिलेल्या तोफेजवळ शिवराय उभे आहेत असे चित्रण हवे होते, पण त्या भक्ताला तोफेची माहितीच नसावी त्याला तो तरी काय करणार? अर्थात असे देवादिकांनी दिलेल्या शस्त्रावर लढून जय मिळवणे हे शिवरायांसारख्या योद्धय़ाचे शौर्यपण कमी करणारे आहे हेदेखील त्या भक्ताच्या लक्षात आले नसावे यात काही वाद नाही.
या देशातील बहुसंख्य लोकांचा धर्म हा हिंदू असल्यामुळे त्या धर्माच्या संदर्भात अधूनमधून प्रसंगपरत्वे लिहिण्याबोलण्याचा प्रसंग येणे साहजिकच आहे. देव प्रत्यक्षात कसे दिसत असतील, त्यांचे रूपस्वरूप काय असेल याची कल्पना करण्याची जबाबदारी अर्थातच आधी म्हटल्याप्रमाणे या धर्मातील वैचारिक मंडळी बाजूला झाल्यामुळे पुरोहित समजल्या जाणाऱया वर्गावर पडली. या वर्गाने आपापल्या वैचारिक कुवतीप्रमाणे देवाच्या रूपाची कल्पना केली. त्यामुळे ती विवेकी व्यक्तींना जशीच्या तशी स्वीकारणे अमान्यच होणार होते आणि तसेच झाले. यातल्या बहुतांशी बुद्धिजनांनी देवाचे अस्तित्वच नाकारले, म्हणजे सरळ सरळ निरीश्वरवादीच झाले. पण बुद्धिप्रामाण्यवादाच्या काठावर असलेल्यांनी मात्र सावध भूमिका घेतली. त्यांची काहींची भूमिका देवाच्या अस्तित्वाबद्दल ‘नरो वा कुंजरो’ या स्वरूपाची होती. म्हणजे देव असेलही आणि नसेलही अशा स्वरूपाची होती, परंतु असे असले तरी ते मुळातच बुद्धिवादी असल्याने आधी म्हटल्याप्रमाणे देवाच्या रूपाची कल्पना भाबडय़ा लोकांनी जी केली ती त्यांनी मान्य तर केली नाहीच, पण तिच्यावर आक्षेप मात्र घेतले. या मंडळींमध्ये आपल्याला सावरकर यांचेही नाव घ्यावे लागेल. कारण त्यांनी आपल्या ‘क्ष-किरणे’ या पुस्तकात अगदी स्पष्टपणे लिहिले आहे की, मनुष्याच्या देवाचे स्वरूपही मनुष्यासारखेच असले पाहिजे, ते अमानवी असता काम नये. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की, देवालाही आपल्याप्रमाणे दोनच हात असतील, एकच तोंड असेल आणि विशेष म्हणजे त्याचे दर्शन भक्तांसाठी ‘सात्त्विक’ असेल ! खरं तर ही भूमिकाही जे लोक ईश्वर-परमेश्वर हा निर्गुण-निराकार आहे असे मानतात त्यांच्याशी जुळणारी नाही. तेव्हा देवाचे दिसणे माणसासारखे असावे या सावरकरांच्या भूमिकेशी भाविकांनी जुळवून घ्यायला हवे, पण चित्रविचित्र स्वरूपात देव, देवी पाहिल्याशिवाय भाबडे भक्त अजिबात संतुष्ट होत नाहीत. त्यामुळेच मग दुर्गादेवीच्या हातात भाला दिला जातो, तिने हातभर जीभ बाहेर काढलेली दाखवली जाते. श्री गुरुदत्त तीन तोंडांचे आणि सहा हातांचे दाखवले जातात, जे न पटणारे आहे. विद्येचे दैवत म्हणून मानले गेलेले दैवत उंदरासारख्या प्राण्यावर विराजमान झालेले दाखवले जाते. यामुळे एखादा अज्ञेयवादीच काय, पण पट्टीचा आस्तिकही नास्तिक होईल.
हे झाले अज्ञानी भक्तांनी रंगवलेल्या देवाच्या रुपाबद्दल ! परंतु देव-देवतांच्या चरित्रातही अविवेकी भक्तांनी बहुधा त्यांना आवडणारी अनैतिकता घुसडवलेली दिसते. म्हणूनच मग खुद्द देवांचा राजा इंद्र हा गौतम ऋषींचे सोंग घेऊन अहिल्येचा पावित्र्यभंग करतो, तर अनुसयेसारख्या पतिव्रता स्त्राrला त्रिदेव विचित्र अवस्थेत भोजन वाढ म्हणून आग्रह धरतात. या सगळ्या गोष्टी केवळ पुराणकथा किंवा भाकडकथा असे म्हणून सोडून देण्यासारखे नाही. कारण गावोगावी चालणाऱया सत्संगातून या कथांचे पारायण होते. याचाच परिणाम म्हणून दादू इंदुरीकर आपल्या ‘गाढवाचे लग्न’ वगनाटय़ात देवांबद्दल म्हणायला धजतो की, या स्वर्गातल्या देवांपेक्षा आमचा पृथ्वीवरील रमेश देव तरी बरा. कारण त्याच्या वागण्याला काहीतरी ‘सीमा’ आहे. मग नाटय़ कलावंतही मागे राहत नाहीत; त्यांना त्यांच्या नाटय़ कलाकृतीतून खरे तर अडाणी भक्तांनी देवाची केलेली विटंबना दाखवायची असते, पण ते लक्षात न घेता स्वयंघोषित संस्कृती रक्षक “आमच्या देवदेवतांचे बिडंबन केले” असा कांगावा करीत नाटय़गृहात एकदा नव्हे, तर दोनदा बॉम्बस्फोट घडवून आणतात. हे सर्व थांबवायचे असेल तर प्रत्येक यच्चयावत धर्मीयाने आपले देवधर्मच नव्हे, तर सण-उत्सवही अविवेकी अन् असंस्कृत लोकांच्या ताब्यात जाणार नाहीत याची काळजी घेणं ाढमप्राप्त आहे!
[email protected]
(लेखक वैज्ञानिक व वैचारिक विषयाचे अभ्यासक असून विवेकवादी चळवळीशी निगडित आहेत)






























































