
डोक्यात टपली मारल्याच्या वादातून एकाची हत्या झाल्याची घटना विलेपार्ले परिसरात घडली. नागेश दुधकवरे असे मृताचे नाव आहे. त्याच्या हत्येप्रकरणी रवी ऊर्फ कुलदीप प्रजापती ऊर्फ टर्कीला जुहू पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
नागेश हा जुहू बस डेपो येथील फुटपाथवर राहत होता. तो वर्सोवा येथे एकाकडे सफाईचे काम करायचा. नऊ दिवसांपूर्वी नागेश त्याच्या मित्रांसोबत जुहू बस डेपोच्या बाजूला एका दुकानासमोर बसला होता तेव्हा टर्कीने मागून येऊन नागेशच्या डोक्यात टपली मारली. टपली मारल्याने त्यांच्यात वाद झाला. वादानंतर टर्कीने बिअरची बाटली नागेशच्या डोक्यात मारून त्याला जखमी केले. बाटली डोक्यात लागल्याने नागेश जखमी झाला. या घटनेची माहिती समजताच जुहू पोलीस घटनास्थळी गेले.
पोलिसांनी नागेशला कूपर रुग्णालयात दाखल केले. याची माहिती त्याच्या भावाला कळवण्यात आली. उपचारादरम्यान नागेशचा मृत्यू झाला. नागेशच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी टर्कीविरोधात गुन्हा दाखल केला. सहाय्यक आयुक्त महेश मुगुटराव यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. जुहू पोलिसांच्या विशेष पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी तपास करून टर्कीला ताब्यात घेऊन अटक केली. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.
























































